पीक कर्जासाठी मेळाव्यांचे आयोजन करावे – कलशेट्टी

0

नंदुरबार। सुलभ पीक कर्ज अभियानाचा कालावधी 31 जुलै 2017 पर्यंत राहणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी बॅकांना डीएलसीसी मार्फत पीक कर्जाचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. या अभियानाद्वारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांना पीक कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने या बँकांना 2017-18 साठी शेतकरी संख्येचा देखील लक्ष्यांक देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी बँकांच्या शाखा असलेल्या गावात वेळोवेळी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.

पीक कर्ज वाटपाचा आढावा
या बैठकीत जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी घेतला त्यात 12 जून अखेर 8803 सभासदांना 121 कोटी 94 लाख पीक कर्ज वाटप करण्यात आले असून कर्ज वाटपाची टक्केवारी 18 टक्के आहे. त्या अनुषंगाने शासन परिपत्रक 6 जून, 2017 च्या अनुषंगाने सुलभ पीक कर्ज अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी पीक कर्ज अभियानाची कार्यपध्दती विशद करतांना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, जिल्हा अग्रणी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी पिक कर्ज अभियानाच्या माहितीचे एकत्रीकरण करुन ही माहिती प्रत्येक सोमवारी राज्यस्तरीय बँकर्स समिती व सहकार आयुक्त कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी.

आढावा प्रत्येक सोमवारी घेण्यात येईल
अभियानाचा आढावा प्रत्येक सोमवारी घेण्यात येईल. अभियान कालावधी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पीक कर्जासाठी दिलेला लक्ष्यांक 100 टक्के साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले.शेतकर्याला खर्या अर्थाने सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर बँकाचेही सहकार्य अपेक्षीत असून सर्व बँकर्सना अपर जिल्हाधिकारी श्री.गाडीलकर यांनी पिक कर्ज मेळाव्याच्या माध्यमातून कर्ज वाटपाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात सर्व बँक अधिका-यांची आढावा बैठक संपन्न झाली.एस.एस.गाडीलकर, निमा अरोरा, एल. पी. साताळकर (शहादा), जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, कृषी विभागाचे अधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, धुळे व नंदुरबार जिहा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी डी.बी.पवार आदी उपस्थित होते.