पीक विम्यापासून वंचित असलेल्या दोन हजार 300 शेतकर्‍यांनाही मिळणार लाभ

0

खासदारांचा पाठपुरावा ; नावासह क्षेत्र चुकल्याने शेतकरी विमा भरपाईपासून राहिले होते वंचित

भुसावळ- आंबिया बहर केळीसह फळपीक विमा योजना 2017 मध्ये सहा हजार 400 शेतकर्‍यांनी विम्याचा हप्ता भरल्यानंतर त्यातील चार हजार 100 शेतकर्‍यांना विम्याची भरपाई मिळाली होती मात्र एक हजार 600 शेतकर्‍यांचे नाव चुकल्याने तसेच क्षेत्र चुकल्याने तसेच 500 शेतकर्‍यांची माहिती पोर्टलवर अपलोड न झाल्याने त्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत होता. खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने या शेतकर्‍यांनाही आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.

खासदार रक्षा खडसेंचा पाठपुरावा
शेतकर्‍यांना या पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह व कृषी विभागाचे सचिव आशिष कुमार भूतानी यांच्याकडे पाठपुरावा केला तसेच जेडीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख कृषी विभागाच्या अधिकार्‍याच्या शिष्टमंडळाने खासदार खडसेंच्या नेतृत्वात 19 डिसेंबर रोजी मुंबई येथे एचडीएफसी अर्गो या इन्शुरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर अभिषेक मिश्रा आणि उपाध्यक्ष रणबीर चड्डा यांची भेट घेत शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ज्या शेतकर्‍यांची नावे चुकली आहे, ज्यांचे क्षेत्र चुकले आहे त्या शेतकर्‍यांना 20 डिसेंबरपासून त्यांच्या क्षेत्रानुसार पीक विम्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. उर्वरित 500 शेतकरी ज्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली नाही अशा शेतकर्‍यांसाठी जेडीसीसी बँकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी आणि पोर्टलचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या शेतकर्‍यांना सुद्धा येत्या आठ दिवसात विम्याचा लाभ मिळणार असल्याचे खासदार खडसे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.