पीक व्यवस्थापन शास्त्राद्वारे दर्जेदार डाळींबाचे उत्पादन शक्य

0

सुनील बोरकर : निर्यातक्षम डाळींब उत्पादन तंत्रज्ञानावर शेतकर्‍यांना प्रशिक्षण

पुणे । देशात डाळींब लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे उत्पादनही वाढले आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार व निर्यातक्षम डाळींब उत्पादन घ्यावे लागणार आहे. पीक व्यवस्थापन शास्त्राद्वारे दर्जेदार डाळींब उत्पादन घेणे शक्य असल्याचे मत आत्मा, पुण्याचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर यांनी व्यक्त केले. कृषी विभागाअंतर्गत आत्मा, पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम डाळींब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य डाळींब बागायतदार संघाचे अध्यक्ष शहाजी जाचक, प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, सोलापूर डाळींब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ज्योत्स्ना शर्मा, आकाशवाणीचे कैलास पिंगळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शाकीरअली सय्यद, डॉ. मिलींद जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उत्पादन वाढीसाठी प्रयत्नांची गरज
वैयक्तिक फायद्यासाठी विविध प्रकारच्या औषध विक्रीतून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. चांगल्या व दर्जेदार मालाच्या उत्पादनासाठी पीक व्यवस्थापन शास्त्र शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, असे बोरकर यांनी पुढे सांगितले. पुणे, सातारा व सोलापूर या भागातील हवामान डाळींबाच्या पिकासाठी पोषक आहे. डाळींब काटेरी झुडूप असून त्याची नैसर्गिता पाहणे महत्वाचे आहे. डाळींब उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी उत्पादन वाढीकडे लक्ष दिले पाहिजे, असे अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.

रोगावरील नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
सोलापूर डाळींब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ज्योत्स्ना शर्मा यांनी डाळींब फळ पिकावरील तेल्या व मर या रोगावरील नियंत्रण व उपचार याविषयी सखोल माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसनही केले. शास्त्रज्ञ शाकीरअली सय्यद यांनी कृषी विज्ञान केंद्रात राबविण्यात आलेल्या मधमाशी प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पामुळे फळपिकावरील औषधांच्या फवारणीमध्ये घट झाल्याचे सांगून यासंबंधीच्या शिबीराचा लाभ शेतकर्‍यांनी घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलींद जोशी यांनी केले. या शिबीरास पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.