जिल्हा न्यायालयाचा निकाल : 12 वर्षाच्या बालिकेशी केले होते अश्लिल वर्तन
जळगाव : धरणगाव तालुक्यात बारा वर्षीय बालिकेचा तिच्या घरात जावून विनयभंग केल्याच्या प्रकरणात केवळ पीडित बालिकेचीच साक्ष ग्राह्य धरुन आरिफ युसुफ खाटीक (25, रा.साकरे, ता.धरणगाव) या आरोपीला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी मंगळवारी हा निकाल दिला. तपासधिकारी वगळता सर्व साक्षीदार या खटल्यात फितूर झाले होते.
धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
पीडित बालिका 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता शाळेत जाण्यासाठी घराचा दरवाजा बंद करीत असताना आरिफ खाटीक हा पीडितेजवळ गेला व बाजारासाठी पिशवी मागितली. दरवाजा उघडून बालिका घरात गेली असता आरिफ तिच्यामागे गेला व तिच्याशी अश्लिल वर्तन केले. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आरिफने तेथून पळ काढला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात कलम 354, 452 व पोक्सो कायदा कलम 7, 8 व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाधिकारी वगळता सर्व साक्षीदार फितूर
सरकारतर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित व तपाधिकारी वगळता पिडीतेची आई, आत्या, पंच यासह इतर सर्व साक्षीदार फितूर झाले होते. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी घटना सत्य असतानाही साक्षीदार फितूर झाले व भविष्यात असेच होत राहिले तर गुन्हा करणार्यांची हिंमत आणखी बळावेल. महिला व बालिकांचे संरक्षण व्हावे व कायद्याचा धाक तयार व्हावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी असा जोरदार युक्तीवाद अॅड.बोरसे यांनी केला. न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद व पीडितेची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील व तुषार मिस्तरी तसेच केसवॉच पंकज पाटील यांनी खटल्यात सहकार्य केले.