पीसीएमसी पदाधिकार्‍यांचा बुधवारी ‘मुख्यमंत्र्यांसोबत व्हॅलेंनटाईन’!

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गेल्या अनेक महिन्यांपासून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे भाजपची पुरती नाचंक्की होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराची चौकशीदेखील करण्याचे आदेश दिले होते. याबाबत पदाधिकार्‍यांची झाडाझती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलविलेली बैठक विविध कारणांमुळे दोनदा रद्द झाली होती. त्याला आता ’व्हॅलेंनटाईन डेे’चा (दि.14) मुहुर्त मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन
425 कोटींच्या रस्ते विकासकामात 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, विरोधकांकडून केला जात आहे. यामध्ये रिंग केली असून, यातून करदात्यांच्या 90 कोटींची लूट झाल्याचा आरोप होत आहे. तसेच भाजपच्या खासदारांनीदेखील याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सद्या भाजप पदाधिकार्‍यांमध्ये सत्तासंघर्ष सुरु असून आर्थिक ओढाताण सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षावरुन पदाधिकार्‍यांमध्ये नेहमीच सुंदोपसुंदी सुरु असते. तसेच वाकड येथील सीमाभिंतीच्या कामातील ’रिंग’ शिवसेनेने हाणून पाडली आहे. विरोधक सत्ताधार्‍यांसह आयुक्तांवरदेखील गंभीर आरोप करत असल्याने भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेने यावरुन रान उठविले आहे. त्यामुळे याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मुख्यमंत्री घेणार चांगलीच ‘हजेरी’
खासदारांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासाच्या कामाचा अहवाल मागविला होता. महापालिकेने त्याचा अहवालदेखील मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. खासदारांनी चौकशीची मागणी केल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, तर, दुसरीकडे जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन स्थायी समिती अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी केल्याची चर्चा होती. सद्या पालिकेत सत्ताबाह्य केंद्राचा हस्तक्षेप वाढत असून, एकमेकांची कामे अडवली जात आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्याची त्यांची खंत आहे. यामुळे सत्ताधार्‍यांमध्ये अंतर्गत कलह पेटला आहे. महिन्याभरापूर्वी समाजकल्याण राज्यमंत्र्यांसमोरच पक्षाच्या माजी शहराध्यक्ष व सरचिटणीसामध्ये हमरी-तुमरी झाली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खासदार, आमदार, पालिकेतील मुख्य पदाधिकार्‍यांची 12 जानेवारी आणि 27 जानेवारीला बोलावलेली आढावा बैठक विविध कारणांमुळे रद्द झाला होती. त्याला आता व्हॅलेंनटाईन डेचा मुहूर्त मिळाला असून, 14 फेब्रुवारीला पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी घेणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले.