पाच हजारांपेक्षा अधिक कर थकित ठेवल्याने कारवाईचा बडगा
तीन महिन्यांत 76 मिळकती जप्त
पिंपरी-चिंचवड : थकबाकीदार 1 लाख 13 हजार मिळकतधारकांना महापालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. आपण थकबाकी भरली नाही, तर महाराष्ट्र अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. यामुळे थकबाकीदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान, डिसेंबर महिन्यापासून 76 मिळकती जप्त, तर नऊ मिळकतींना टाळे ठोकण्यात आले आहेत. शहरात 11 कोटी 74 लाख थकबाकी असून, त्यापैकी 4 कोटी 35 लाख वसुली झाली आहे.
सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू
या नोटिसा पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकीत रक्कम आहे, त्यांना पाठविल्या गेल्या आहेत. महापालिकेकडे आजअखेरपर्यंत 391 कोटी 11 लाख कर भरणा झाला असून, त्यापैकी 138.11 कोटी भरणा ऑनलाईन पद्धतीने झाला. एक लाख 19 हजार 812 नागरिकांनी ’ऑनलाईन’ कर भरणा केला असून, 35.33 नागरिकांनी ऑनलाईन कर भरण्यास पसंती दिली आहे. नागरिकांच्या सोईचे दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरु ठेवण्यात आली आहेत. मिळकतधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. तसेच मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणार्या मिळकतधारकांना सामान्य करात 2 टक्के सवलत आहे. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.