पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत! समीर वर्मा पराभूत

0

सेऊल । भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने कोरियन ओपन सुपर सीरिजमधील आगेकूच कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य लढतींमध्ये समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. मागिल महिन्यात जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या सिंधूने क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या मिनात्सू मितानीचा 21-19, 16-21, 21-10 असा पराभव केला. पाचवे मानाकंन मिळालेल्या सिंधूचा मिनात्सूविरुद्ध 1-1 असा रेकॉर्ड होता. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना तिसर्‍या मानांकित सुंग जि ह्यून किंवा चीनच्या ही बिंगजियाओ यांच्यातील विजेतीशी होईल. महिला एकेरीच्या लढतीत सिंधूने सुरुवातीपासूनच 6-2 अशी आघाडी घेतली होती. पण मितानीने बाऊन्सबॅक करत ही पिछाडी 11-9 अशी भरुन काढली. एकवेळ दोघीजणी 16-16 अशा बरोबरीत होत्या. या बरोबरीनंतर सिंधूने 19-16 अशी आघाडी मिळवली.

मितानीने सिंधूला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात तीला यश मिळाले नाही. दुसर्‍या गेममध्ये मितानीने 13-13 अशा बरोबरीनंतर आपला खेळ उंचावत हा गेम जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये सिंधूने मितानीला पुनरागमन करण्याची संधीच मिळू दिली नाही. पहिल्या ब्रेकपर्यंत सिंधूने 11-6 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. त्यानंतर सिंधूने 19-9 अशी आघाडी मिळवून गेमसह सामनाही आपल्या खिशात टाकला. पाच महिन्यांपूर्वी समीर वर्माने इंडियन सुपर सिरीजमध्ये सोन वॉनला पहिल्याच फेरीत हरवले होते. यावेळी मात्र त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.