पी. व्ही. सिंधू, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत

0

सेऊल । जागतिक आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने कोरियन आोपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या लढतींमधील आगेकूच कायम राखत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पुरूष एकेरीच्या लढतीत मात्र भारताला गुरुवारी संमिश्र यश मिळाले. भारताची मदार असलेल्या पारुपली कश्यपला चुरशीच्या लढतीत पराभव पत्कारावा लागला. अन्य लढतीत भारताच्या समीर वर्माने आव्हान कायम राखताना अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवताना थायलंडच्या नितचाओन जिंदापोलचा 22-20, 21-17 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जपानच्या मितांसु मितानीशी होईल.

2014 मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत मितानीने कांस्यपदक मिळवले होते. त्याआधी 2012 मध्ये मितानीने सायना नेहवालला हरवून फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. हाँगकाँग सुपर सिरीजची अंतिम फेरी गाठणारा आणि सय्यद मोदी ग्रांपी गोल्ड स्पर्धा जिंकणार्‍या समिर वर्माने हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंटवर 21-19, 21-13 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीतले स्थान निश्‍चित केले. उपांत्यपूर्व फेरीत समिरचा सामना यजमान देशाच्या सोन वॉनशी होईल. सोन वॉनने अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना पारुपल्ली कश्यपला हरवले. सुमारे एक तास 16 मिनीटे रंगलेल्या या लढतीत कश्यपवर 16-21, 21-17, 21-16 असा विजय मिळवताना सोन वॉनला खूपच घाम गाळावा लागला.