बारामती । भीमा कोरेगाव दंगलीत घर जळीत प्रकरणाची साक्षीदार पुजा सकट हिच्या संशयास्पद मृत्यूस जबाबदार असणार्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी बारामतीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने भिगवण चौकात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सुनिल शिंदे, दलित युवक आंदोलनाचे अध्यक्ष साधू बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उपनराध्यक्ष बिरजू मांढरे, मधूकर मोरे, माऊली कांबळे, रविंद्र सोनवणे, अभिजीत कांबळे, मयूर मोरे, निलेश जाधव, लक्ष्मणराव भिसे, उमेश दुबे, राजू कांबळे, रत्नप्रभा साबळे, पुनम घाडगे आदींसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. नायब तहसीलदार ठोंबरे यांनी अंदोलकर्त्यांकडून निवेदन स्विकारले.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
दंगल पीडित सुरेश सकट कुटुंबाचे शासनाने योग्य पुनर्वसन करावे, भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अॅट्रॉसिटी प्रकरणात फिर्यादीवर व सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दरोडा आदी गंभीर गुन्हे दाखल करणार्या आधिकार्यांना निलंबित करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.