अहमदाबाद – पुढील दहा दिवसांत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी बदलतील, असा दावा पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपाणींबद्दल अफवांना पेव आले होते. मात्र, तरीही मुख्यमंत्री रुपाणी यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करत नव्हते. मात्र आता त्यांनी मौन सोडत, अशी कोणत्याही स्वरुपाची शक्यता नाकारली आहे.
राजीनामा सादर केला
रुपाणी यांनी त्यांचा राजीनामा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला आहे. पुढील १० दिवसांत भाजप त्यांच्या जागी एकतर पटेल किंवा क्षत्रीय समाजातील व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नव्याने नियुक्ती करेल, असेही पटेल याने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रुपाणी यांच्या जागी आरएसएसचे भिकुभाई दालसानिया किंवा गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचेही हार्दिक पटेलने म्हटले आहे.
पटेल याचा दावा फेटाळताना रुपाणी यांनी म्हटले आहे, की मला कसल्याही प्रकारच्या राजीनाम्याची माहिती नाही. मी कसल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला किंवा माझ्या राजीनाम्याचा काहीही प्रश्न नाही. तसेच यावेळी पटेल काँग्रेसचा एजंट असल्याचेही म्हटले आहे.