नवी दिल्ली । विद्यार्थ्यांसाठी केंद्रसरकारचा एक सुखद धक्का आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) 2019 च्या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम निम्मा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. सध्याचे शालेय अभ्यासक्रम हे कला व वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्यापेक्षा जास्त आहेत.
अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याची गरज
शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याची गरज असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी वेळ मिळायला हवा. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. या शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणे अत्यावश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
नवे शैक्षणिक धोरणाचा मसुदा पुढील महिन्यात
दरम्रान, बहुचर्चित नव्या शैक्षणिक धोरणाबाबत पुढील महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर केला जाईल, आवश्यक त्या मान्यता मिळाल्यानंतर ते जाहीर केले जाईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमधील गुण-दोष हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे काम आहे, असे ते म्हणाले. जावडेकर यांनी परीक्षा पद्धती सांगताना परीक्षेशिवाय स्पर्धा अशक्य आहे, असे सांगितले. त्यामुळे परीक्षा गरजेचीच आहे. मार्चमध्ये विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास मेमध्ये त्याला एक संधी दिली जाईल. मात्र, दोन्ही वेळेस अनुत्तीर्ण झाल्यास त्याला आहे त्याच वर्गात ठेवले जाईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
सर्वांनी केले स्वागत
नव्या धोरणाचे शैक्षणीक क्षेत्रातील तज्ञ मंडळींने स्वागत केले असून विद्यार्थी, पालक व शिक्षकही यामुळे सुखावणार आहेत, असे जावडेकर याबाबत म्हणाले.