पुणेकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी आता महापालिकेचा पुढाकार

0

आजपासून एकाच वेळी धडक कारवाई; वाहतूककोंडीची शंभर ठिकाणे निश्‍चित

पुणे : पुणेकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणार्‍या वाहतूककोंडीची शंभर ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी येत्या आजपासून एकाच वेळी धडक कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात वाढलेल्या वाहनाची प्रचंड संख्या आणि त्यात पथारी व्यावसायिक, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत व बेशिस्त पार्किंग यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. यामुळे होणार्‍या प्रचंड वाहतूककोंडीमुळे पुणेकरांचा श्‍वास गुदमरू लागला आहे.

स्वतंत्र दहा पथकांची नियुक्ती

यावर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळेच आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन महापालिका आणि वाहतूक पोलीस, पोलीस यांनी एकत्र येऊन संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गेल्या एक-दीड महिन्यांपासून विविध बैठका घेण्यात आल्या. याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यात पाहणी करून शहरात मोठी वाहतूककोंडी होणारे तब्बल 100 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिका, वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्यातर्फे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, कारवाईसाठी तब्बल 25 क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत रस्ते मोकळा श्‍वास घेतील अशी अपेक्षा आहे.

अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणांमुळे कोंडी

शहरातली प्रामुख्याने मध्यवर्ती भागातील रस्ते, पेठामधील चौक तसेच वारंवार कोंडी होणार्‍या चौकाचा समावेश आहे. या ठिकाणी होणार्‍या अनधिकृत पार्किंग तसेच अतिक्रमणांमुळे कोंडी होऊन सकाळी आणि सायंकाळी त्याचा परिणाम या कोंडीच्या ठिकाणांवर जोडणार्‍या रस्त्यांवर होतो. परिणामी शहरातील वाहतूकीचा वेग मंदावून एकाच वेळी जवळपास 40 ते 50 टक्के वाहतूककोंडी होऊन त्याचा ताण सर्वच यंत्रणांवर येतो; ही बाब लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाहतूककोंडीसाठी प्रथमच संयुक्त कारवाई

शहरात होणार्‍या वाहतूककोंडीचा पुणेकरांना मोठा फटका बसत आहे. परंतु वाहतूककोंडी पोलिसांचा विषय, पोलिस महापालिका कारवाई करत नाही असे प्रकार सुरू होते. परंतु आता महापालिका, पोलीस आणि आरटीओ सर्व विभाग एकत्र येऊन संयुक्त काम करत आहेत. यात वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी दोन दिवसांत ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका केवळ अतिक्रमणे काढते तर पोलीस वाहतूक सुरळीत करतात. परंतु ही कारवाई एकत्र होत नसल्याने त्यांचे परिणाम दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील वाहतूककोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
सौरभ राव, महापालिका आयुक्त