‘पुणेकरांचे हाल, परंतु पोलीस झाले मालामाल!’

0

हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे ‘सविनय कायदेभंग’ रॅली

पुणे : हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी मात्र आंदोलकांनी हेल्मेट न वापरल्याने रॅली सुरू असताना दंड करून इ-चलन फाडले.

रॅलीच्या प्रारंभी समितीतर्फे सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘हेल्मेट सक्ती रद्द करा, पुणेकरांचे हाल, पोलीस झाले मालामाल, हेल्मेट हटाव पुणेकर बचाव’ अशा घोषणा देत समितीच्या कार्यकर्त्यानी सत्ताधारी व पोलीस प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. या वेळी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, समन्वयक अंकुश काकडे, मोहन जोशी, रुपाली पाटील, धनंजय जाधव, मंदार जोशी उपस्थित होते. या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी, फुले पगडी, शिंदेशाही पगडी, फेटे, गांधी टोपी परिधान करून निषेध नोंदविला.

शहरामध्ये पेठांच्या परिसरात तसेच मध्य पुण्यामध्ये रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. दुचाकीचा वेग हाताशी 20 किमीपेक्षा जास्त जात नाही. अशा परिस्थितीमध्ये हेल्मेट बाळगणे अडचणीचे ठरते. हेल्मेटमुळे विविध प्रकारच्या अडचणी येतात, शारीरिक त्रास होतो, अशाप्रकारची कारणे देत हेल्मेट सक्तीला सातत्याने विरोध होत राहिला आहे. दरम्यान, यावेळीही पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्ती जाहीर केल्यानंतर हेल्मेट विरोधी कृती समितीने याला विरोध करायला सुरुवात केली.

रॅलीची सुरुवात होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी लावण्यात आला होता. रॅलीत सहभागी होणार्‍या प्रत्येक दुचाकीचा नंबर पोलिसांनी नोंदवून घेत त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. मात्र, पोलिसांनी कारवाई केली तरी हेल्मेट सक्तीला विरोध राहणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. यासंदर्भातील निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. या रॅलीत सामाजिक संघटना, संस्था यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कृती समितीचे कार्यकर्ते, नेते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.