पुणेकरांच्या नाराजीची दखल भाजप घेणार की नाही?

0
पुणे : पाणीकपातीच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष एकाकी पडला आहे, त्यातच दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी पुण्याच्या पोलीस खात्याने कारवाई चालूच केल्याने पुणेकरांच्या असंतोषात भर पडली आहे. त्याची दखल भारतीय जनता पक्षाचे नेते घेणार की नाही?
हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी ऐन दिवाळीत महापालिकेने पाणीकपात लागू केली. त्यामुळे भाजप बद्दल संताप निर्माण झाला. खुद्द भाजपचे  खासदार अनिल शिरोळे यांनीच पाणीकपातीच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा दिल्याने कपात रद्द झाली तरीही संभाव्य पाणीकपात पालकमंत्री गिरीश बापट सूचित करीत असतातच. या कपाती विरोधात पुण्यात विरोधी पक्षाची आंदोलने चालू असतानाच आता पोलीस खात्याने हेल्मेट सक्तीसाठी यंत्रणा राबविण्यास सुरुवात केल्याने भाजप पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.
दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे पण त्याकरिता सक्ती नसावी अशी भूमिका घेऊन पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन हाती घेतले आहे. या संघटनांची येत्या आठवड्यात बैठक होईल, असे आंदोलनाचे संयोजक विवेक वेलणकर यांनी सांगितले. हेल्मेटविरोधी आंदोलनात भाजपचे पदाधिकारी संदीप खर्डेकर आणि काही नगरसेवक सहभागी आहेत. भाजपचे आमदार विजय काळे यांनी हेल्मेट सक्तीला जाहीर विरोध केला आहे. हे मोजके प्रतिनिधी वगळता भाजपच्या अन्य आमदारांनी मौन बाळगले आहे. भाजपचे पुण्यातील दोन खासदारही या विषयावर गप्प आहेत.
पोलिस खात्याने वाहतुकीसंदर्भात गेल्या दोन तीन वर्षांपासून कॉलेज तरुण तरुणींना टार्गेट केले आहे. हेल्मेट सक्ती राबविताना पुन्हा कॉलेज विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यास सुरुवात झाली. भाजपकडे असलेला तरुण वर्गाचा ओढा अशा कारवाईमुळे घटत जाईल आणि त्याचा फायदा आक्रमक भाषा करणाऱ्या शिवसेना, मनसे या पक्षांना होईल अशी शक्यता आहें.
पुण्यातील अरूंद रस्ते, वाहतूक कोंडी या कारणांमुळे हेल्मेट सक्ती व्यवहार्य ठरत नाही. त्याचप्रमाणे सर्दी, स्पॉंडिलायटीस अशा आजारांनी त्रस्त व्यक्तींना हेल्मेट वापरणे सोयीचे नाही, अशी सक्ती करणे अव्यवहार्य आहे असे मत सर्वसाधारणपणे मांडले जाते. कायद्यानुसार हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे असे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे. परंतु तसेतर वाहतुकीसंदर्भात अन्य कितीतरी कायदे आहेत. कायद्याप्रमाणे रस्त्यात गतिरोधक करणे आवश्यक आहे, पदपथ करणे गरजेचे आहे त्याची अंमलबजावणी होत नाही. मग, हेल्मेट सक्ती कशाकरिता? असा संघटनांचा प्रतिसवाल आहे.