पुणेकरांना मिळणार 11.50 टीएमसी पाणी!

0

पुणे । महापालिका पुणेकरांना जादा पाणी देत असल्याचा कांगावा करत पुणेकरांना दिल्या जाणार्‍या पाण्यावर जादा दंड आकारण्याची धमकी वजा इशारा देणारा जलसंपदा विभाग नरमला आहे. पुणे महापालिकेस राज्यशासनाने शहरासाठी 11.50 टीएमसी पाणीसाठा मान्य केला असून त्या मर्यादेत पाणी वापरावर भर द्यावा, तसेच पाणी जपून वापरावे, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेस नुकतेच दिले आहे.

वारंवार महापालिकेस दंडात्मक कारवाईचा इशारा देणार्‍या जलसंपदा विभागाच्या या पत्रामुळे महापालिका प्रशासनाही चक्रावले होते. शहरातील पाणी वापरावरून महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वादाचे खटके उडत आहेत. त्यामुळे मागील महिन्यातच जलसंपदा विभागाने एका सुनावणीत महापालिकेचा पाण्याचा कोटा 11.50 टीएमसी वरून थेट 8.19 टीएमसी करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर पालिकेने वापरलेल्या जादा पाण्याच्या थकबाकीपोटी पालिकेकडे तब्बल 354 कोटींच्या निधीची मागणी केली. त्यामुळे या दोन्ही मागण्यांवरून या दोन विभागात वाद सुरू होता.

जलसंपदा विभागाची कोंडी
महापालिकेच्या पाण्यात कपात करावी, अशी मागणी जलसंपदा विभागाकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या कालवा समितीच्या बैठकीत केली. मात्र, याबाबत कोणताही निर्णय न घेता पुणे शहराचा पाणी पुरवठा कायम ठेवण्याचे आदेश महाजन यांनी दिले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाचीच कोंडी झाली. त्यामुळे आपल्या भूमिकेवरून आता माघार घेत जलसंपदा विभागाने महापालिकेस पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महापालिकेचा वार्षिक पाणीकोटा 8.19 टीएमसी करण्याचे आदेश दिलेल्या जलसंपदा विभागाने आता या पत्रात मात्र, महापालिकेस 11.50 टीएमसी पाणीसाठा मंजूर असल्याचा उल्लेख आर्वजून करण्यात आलेला आहे.