हेल्मेट वापरणे ऐच्छिक असावे त्याची सक्ती नको अशी पुणेकरांची सर्वसाधारण भावना
पुणे : दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचा पोलिस प्रशासनाचा प्रयोग पुण्यात पुन्हा एकदा फसला आहे. काँग्रेस पक्षाने सक्तीला तीव्र विरोध केला तर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन हेल्मेट विरोधी कृती समितीमार्फत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. पोलीस दडपशाही करीत असून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे सूर्यकांत पाठक यांनी केला आहे. या वातावरणात पुणेकरांनी खरोखरच हेल्मेट सक्ती नाकारली असेच म्हणावे लागेल.
नववर्षाच्या प्रारंभापासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती राबविणे सुरू केले. गेल्या पंधरा दिवसांपासून सक्तीचे आदेश बजावण्यात आले होते. परंतु मंगळवारी पहिल्या दिवशी प्रमुख रस्त्यावर सकाळी फेरफटका मारला तेव्हा हेल्मेटधारकांची संख्या अगदी तुरळक वाढल्याचे आढळले. काही दुचाकीस्वार मिरवणुकांनी गेले तेसुद्धा हेल्मेट परिधान न करता गेल्याचे दिसले. नवीन पोलीस अधिकारी पुण्यात आले की हेल्मेट सक्ती राबवू पाहातो, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये होती.
विद्यार्थ्यांना पकडून जबर दंड
दुचाकीवर येथील जीवनमान अवलंबून आहे, सर्वाधिक दुचाकी असणारे हे शहर आहे. मध्यवस्तीतील छोट्या रस्त्यांवर 20 किमीपेक्षा अधिक वाहनांचा वेग ठेवता येत नाही. त्यामुळे हेल्मेट वापरणे व्यवहार्य ठरत नाही, हेल्मेट वापरणे ऐच्छिक असावे त्याची सक्ती नको अशी साधारण भावना पुणेकरांची आहे. हेल्मेट सक्तीसाठी महाविद्यालयीन तरुणांना पोलीस खाते वेठीस धरत असल्याच्या तक्रारी आहेत. कॉलेज परिसरातील मार्गावर पाच दहा पोलिसांचा घोळका उभा राहातो आणि विद्यार्थ्यांना पकडून जबर दंड वसूल करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पुणेकरांनी केल्या. यापूर्वी हेल्मेट सक्ती राबविण्याचे प्रयत्न झाले तेव्हा भाजपचे नेते विरोधात होते सध्या ते कुठे गेले? अशीही चर्चा सुरू आहे.
काँग्रेस पक्षाचा विरोध
हेल्मेटसक्ती करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून या नावाखाली चाललेली दंडात्मक कारवाई ताबडतोब थांबवावी अशी मागणी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे. शहरात वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु चौकाचौकात पाच-पाच, दहा-दहा पोलीस घोळक्याने थांबलेले दिसतात. पोलिसांच्या वाहतूक खात्याने त्यांच्याकडील मनुष्यबळाचे नियोजन करणे आवश्यक असून त्याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष द्यायला हवे. अशी सूचना बागवे यांनी केली आहे.
कृती समितीचा विरोध
हेल्मेट सक्तीच्या कारवाईला हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. काही ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे. मात्र, त्याला कृती समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी कृती समितीकडून वेगवेगळी पावले उचलली जाणार आहेत. त्यानिमित्ताने येत्या 3 जानेवारीला सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. कृती समितीचे कार्यकर्ते हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयात दुचाकीवरून जाणार आहेत. त्यावेळी हेल्मेट सक्ती न करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही कारवाई होत असल्यास आपआपल्या परिसरातील आमदारांना फोन करून तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 8 आमदारांचे मोबाईल क्रमांक सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले जाणार आहेत.
न्यायालयात जाण्याचा इशारा
पोलिसांकडून केली जात असलेली हेल्मेट सक्ती चुकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा गैरअर्थ लावून पोलिस न्यायालयाचा अवमान करत आहेत. 2015 मध्येही याच स्वरूपाची हेल्मेट सक्ती तत्कालीन आयुक्तांनी लागू केली होती. मात्र, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या 22 एप्रिल 2014 च्या राजशेखरण विरुद्ध भारत सरकारच्या दाव्याची त्रिसदस्यीय खंडपीठाच्या निकालपत्राची प्रत व महाराष्ट्र मोटार वाहन नियमाबाबत 17 जानेवारी 2005 ची प्रत दिली. त्यामध्ये पालिका क्षेत्रांमध्ये हेल्मेट सक्ती लागू होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर हेल्मेट सक्ती थांबली. पोलिसांनी हेल्मेट सक्ती थांबवावी, अन्यथा त्याविरुद्ध न्यायप्राधिकरणाकडे दाद मागू, अशा स्वरूपाचे पत्र विश्वास चव्हाण यांनी पोलिस आयुक्तांना पाठविले आहे.