पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट!

0

पुणे । पुणेकरांना उन्हाच्या झळा बसू लागल्यानंतर येत्या काळात पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दौंड, इंदापूर येथील शेतकर्‍यांनी जादाचे आवर्तन मागितल्यास पुणे शहरात पाणीकपात करावी लागेल, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे अभियंता पांडुरंग शेलार यांनी म्हटले आहे. पुणे शहराला वरसगाव, टेमघर, पानशेत, खडकवासला या धरणांतून पाणी दिले जाते. 29 टीएमसी पैकी दौंड, इंदापूर, पुणे शहर, औद्योगिक कंपन्यांना पाणी दिले जाते.

पाणी वाचविण्याचा पुणेकरांना सल्ला
पुणे शहराला दररोज 1350 एमएलडी पाणी हे जलसंपदा विभागाकडून दिले जाते. पण, दिवसेंदिवस पुणे शहराचा विस्तार होवू लागल्याने पाण्याची गरज वाढू लागली. त्यामुळे पालिकेतील अधिकारी, पदाधिकार्‍यांनी पाणी वाढवून देण्याची मागणी सुरू केली. यावर्षी टेमघर, वरसगाव दुरुस्तीसाठी रिकामे केले असून पानशेतमध्ये 60 टक्के, खडकवासलामध्ये 83 टक्के, असा 8 टिएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीला पुणे शहरात पाणी कपात करण्यात आली नाही. परंतु, दौंड, इंदापूर येथील शेतकर्‍यांनी पाण्याचे जादा आवर्तन मागितल्यास आठ पैकी चार टिएमसी पाणी दिले गेले, तर पुणे शहरात पाणीकपात करावी लागेल. यावर पालिकेने गंभीर विचार करण्याची गरज आहे, असे अभियंता पाडुंरंग शेलार यांनी स्पष्ट केले. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र पाणीकपातीवर न बोलता शहरात पाणी वाचविण्याचा सल्ला पुणेकरांना दिला आहे. शहरात सध्या पाणीगळतीवर पालिकेच्या माध्यमातून व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.