पुणे । ‘पुणे फिल्म फाउंंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या ’पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे हे 16 वे वर्ष आहे. येत्या गुरुवारी (दि.11) दु. साडेचार वा. कोथरूड सिटी प्राईड चित्रपटगृहात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी रमेश सिप्पी, रमेश प्रसाद आणि एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तर राजदत्त यांना 18 जानेवारी रोजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी गौरवण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अॅलन ड्रल्जेविक दिग्दर्शित ‘मेन डोन्ड क्राय’ हा बोस्नियन भाषेतील चित्रपट दाखवून महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व ’प्रसाद स्टुडिओज्’चे प्रमुख रमेश प्रसाद आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ’पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) ’पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, तर प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ’एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रमेश सिप्पी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘अंदाज’ (1971) हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी 1972 मध्ये आलेल्या ‘सीता और गीता’ने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली आणि 1975मध्ये आलेल्या ‘शोले’ या चित्रपटाने तर लोकप्रियतेच्या सर्व पाय-या पार केल्या. ‘शान’, ‘शक्ती’, ‘सागर’ अशा अनेक चित्रपटांबरोबरच सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेली ’बुनियाद’ ही दूरचित्रवाणीवरील मालिकाही विशेष लोकप्रिय झाली.