पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व

0

पुणे : 33वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने 42 किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण 15 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 102 परदेशी स्पर्धकांचा समावेश होता.

इथिओपियाच्याच गतविजेत्या बेशा गेटाचेव याने उपविजेतेपद पटकावले. बेकेले अबेबा याने तृतीय स्थान पटकावले. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये डेबेडने 2 तास 17 मि. 17 सेंकद तर बेशा गेटाचेव याने 2 तास 18 मि. 7 सेंकदात पूर्ण केली. तिसर्‍या क्रंमाकावरील बेकेले याने 2 तास 18 मि. 38 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. महिलांमध्ये 42.195 किमी अंतराची शर्यत केनियाच्या पास्कलिया चेप्कोगेइने जिंकली. तर इथिओपियाच्या बेलेव असर मेकोनेनने दुसरा आणि इथिओपियाचीच फेकेडे सिमेन तिलाहूनने तिसरा क्रमांक मिळविला.

सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) 42 किमी, हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी, 5 किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा समावेश होता. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते.