रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय
पुणे : रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुटीतील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे-उदयपूर दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी 11 एप्रिलपासून सोडण्यात येणार आहे. पुणे-उदयपूर (गाडी क्र. 09676) ही गाडी 11 एप्रिल ते 27 जूनदरम्यान धावेल. उदयपूर-पुणे (गाडी क्र. 09675) ही गाडी 9 एप्रिल ते 25 जून या कालावधीत धावणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 12 फेर्या होणार आहेत. पुणे-उदयपूर ही गाडी दर गुरुवारी रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री नऊ वाजून 10 मिनिटांनी उदयपूरला पोहोचेल. गाडीचा परतीचा प्रवास दर मंगळवारी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल. ती बुधवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी पुणे स्थानकात दाखल होईल. गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, बडोदा, रतलाम, मंदसोर, नीमच, चित्तौडगढ, मावली जंक्शन, राणा प्रतापनगर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-वलसाड दरम्यानही गाडी
पुणे – वलसाड या दरम्यान 9 एप्रिल ते 4 चार जुलै या कालावधीत द्वि-साप्ताहिक गाडी चालविली जाणार आहे. पुणे-वलसाड (01395) गाडी दर मंगळवारी आणि गुरुवारी पुणे रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून 35 मिनिटांनी सुटून दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी वलसाडला पोहोचेल. तर, वलसाड-पुणे गाडी (01396) त्याच दिवशी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ती रात्री नऊ वाजून 25 मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. या गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, बोईसर, वापी आदी थांबे देण्यात आले आहेत.