पुणे-जबलपूर एक्स्प्रेस व सेवाग्राम एक्स्प्रेसमधून तीन प्रवाशांचे मोबाईल लंपास

भुसावळ : प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत दोन वेगवेगळ्या घटनेत तीन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना पुणे-जबलपूर एक्स्प्रेस व सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये सोमवारी रात्री घडली.याप्रकरणी भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून एक गुन्हा मनमाड तर दुसरा नाशिक जीआरपी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पुणे खडकी येथील रहिवासी नरेद्रकुमार सूर्यशेखर सिंग हे डाऊन पुणे जबलपूर एक्स्प्रेस या गाडीच्या बी-1 या डब्यातील सीट एकवरून प्रवासा करीत असतांना बेलापूर रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांच्या झोपेचा फायदा घेत कोणी तरी चोरट्यांनी सिंग यांचा मोबाईल लांबविला. ही घटना सोमवारी दुपारी 3.30 वाजता घडली. सुमारे 16 हजार रुपये व 12 हजार रुपये असे एकुण 28 हजार रूपये किंमतीचे हे मोबाइल चोरट्यांनी लांबविले. या प्रकरणी भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मनमाड जीआरपी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

सेवाग्राम एक्स्प्रेसमधून मोबाईलची चोरी
नाशिकरोड स्थानकावर सेवाग्राम एक्स्प्रेस थांबली असतांना गर्दीचा फायदा घेत अनिकेत मोहन दयाल (रा.जळगाव) यांचा मोबाईल कोणीतरी चोरट्याने लांबविला. ही घटना रविवारी 6.20 वाजेच्या सुमारास घडली. सुमारे 11 हजार 700 रुपयांचा हा मोबाईल होता. या प्रकरणी भुसावळ जीआरपी पोलिसांकडे दयाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा नाशिकरोड जीआरपी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.