पुणे-जबलपूर, मुंबई-रेवा गाड्यांना मुदतवाढ

भुसावळ : प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते रेवा आणि पुणे-जबलपूर दरम्यान धावणार्‍या फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांचा कालावधीत वाढवला आहे. यामुळे सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

वेळ व थांब्यात कुठलाही बदल नाही
02131 पुणे-जबलपूर स्पेशल ही गाडी पुणे येथून 15 ऑगस्ट ते 26 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी सुटणार आहे. तर 02132 जबलपूर-पुणे सुपरफास्ट ही स्पेशल गाडी 14 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे पुण्यातून जबलपूरला व जबलपूरहून पुण्यात जाणार्‍यांची सोय होईल. तसेच 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रेवा ही गाडी 29 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी धावेल. 02187 रेवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल गाडी 28 जुलै ते 29 सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. या गाड्यांच्या धावण्याचे दिवस, वेळ आणि थांबे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.