पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा

0

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर : जनावरांच्या विक्रीचे प्रमाण वाढले

पुणे : पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठीच्या चार्‍याची समस्या रौद्ररूप धारण करू लागली आहे. माणसांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी मिळेल, पण जनावरांच्या पाण्याचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परीणामी केवळ चारा-पाण्याअभावी जनावरांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. जनावरांच्या बाजारात आवक वाढली असून, मागणीत घट झाली आहे. परिणामी दुभत्या गाई-म्हशींसह सर्वच जनावरांच्या किंमती पूर्वीपेक्षा निम्म्यावर आल्या आहेत.

सरकारी नियमानुसार टंचाई काळात प्रतिमाणसी 40 लिटरप्रमाणे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तरतूद आहे. पण यामध्ये जनावरांसाठीच्या पिण्याचा पाण्याचा विचारच आतापर्यंत करण्यात आलेला नाही. यामुळे दुष्काळी भागातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची तरतूदच केली जात नाही. परिणामी पाण्याअभावी जनावरांची होणारी आभाळ रोखण्यासाठी शेतकरी त्यांची विक्री करू लागले आहेत.

बारामती तालुक्यात 14 टँकरने पाणी पुरवठा

राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये आंबेगाव, बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, हवेली, मुळशी, भोर, वेल्हे या तालुक्यांचा समावेश आहे. खेड, जुन्नर आणि मावळ या तीन तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीतून वगळण्यात आले आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या तीनपैकी जुन्नर तालुक्यात आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी दोन टँकर सुरू झाले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 68 गावे आणि 349 वाड्या-वस्त्यांना 23 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक 14 टँकर बारामती तालुक्यात सुरू आहेत. पुरंदर तालुक्यांत तीन, तर जुन्नर, दौंड व शिरूर तालुक्यांत प्रत्येकी दोन टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी सांगितले.

उत्पादनात घट

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तोही वेळेवर न झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट झालेली आहे. त्यातच यंदा परतीचा पाऊसही झाला नाही. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना आधार मिळत असे. तोही आधार गेल्याने, केवळ पावसाअभावी जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आली आहेत.

पाणीसाठ्यात 25 टक्क्यांनी घट

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही सरासरी 25 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत हाच साठा 95 टक्क्यांहून अधिक होता. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा 20 टक्क्यांनी घटला आहे. याचा परिणाम सिंचनासाठीच्या पाण्यावर होऊ शकणार आहे. त्यामुळे यंदा शेतीचे पाणीही फक्त पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

टंचाई आराखड्यात बदल

संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यात बदल करण्यासाठी ते बदल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात येतील.
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे