आमदार बाबुराव पाचर्णे : जागतिक बँकेच्या अधिकार्यांसह स्थानिक अधिकार्यांची बैठक
शिरूर । पुणे ते शिरूर या सहापदरी रस्त्याच्या कामाचे डीपीआर बनविण्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या एकूण खर्चापैकी 40 टक्के रक्कम राज्य सरकार तर 42 टक्के रक्कम कर्जातून उभी करण्यात येईल. उर्वरित 18 टक्के रक्कम संबंधित उद्योजक देणार आहेत. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा टोल द्यावा लागणार नाही, अशी माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.
‘हायब्रीड एन्युइटी’मधून पुणे ते शिरूर रस्त्याचे सहापदरी काम होणार असून, या मार्गावर काही ठिकाणी उड्डाणपूल करण्यात आहेत. या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जागतिक बँक प्रकल्प विभागाचे अधिकारी आणि शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, सहाय्यक मुख्य अभियंता जे. डी. कुलकर्णी, जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी आदींनी रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दौर्यानंतर या अधिकार्यांची बैठक घेण्यात आली.
डीपीआरमधील विविध सूचना
या रस्त्याच्या कामासंदर्भात डीपीआर करताना विविध सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिरूर बायपासला एक सब-वे तयार करणे, शिरूर शहरातून जाणार्या रस्त्यावर एक अत्याधुनिक पद्धतीचे सर्कल बनविणे, बोर्हाडे मळा ते रामलिंग रस्त्याला जोडणारा सबवे, न्हावरा फाटा येथे अत्याधुनिक सर्कल, सरदवाडी गावातून सब-वे, ‘एमआयडीसी’तील यश इन चौकात भुयारी मार्ग, कारेगाव येथे भुयारी मार्ग, रांजणगाव गणपती, कोंढापुरी कासारी फाटा येथे सब-वे, शिक्रापूर येथील मलठण चौक ते चाकण चौकापर्यंत उड्डाणपूल, सणसवाडी येथे अत्याधुनिक सर्कल, कोरेगाव भीमा, लोणीकंद येथे उड्डाणपूल तयार करणे, वाघोलीतील जैन कॉलेज ते वाघेश्वर मंदिरापर्यत उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डीपीआरचे काम सुरू
पुणे ते शिरूर या सहापदरी रस्त्याचा डीपीआर बनविणे सुरू झाले आहे. या रस्त्यावर कोणताही प्रकारचा टोल द्यावा लागणार नाही. रस्त्यासाठी 40 टक्के रक्कम राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. तर 42 टक्के रक्कम कर्जातून उभी करण्यात येणार आहे. परिसरातील उद्योजक 18 टक्के रक्कम देणार आहेत.
– बाबूराव पाचर्णे, आमदार