पुणे-दौंड लोकल आता मार्चनंतरच धावणार

0

प्लॅटफॉर्मची काम अंतिम टप्प्यात : रेल्वे प्रशासनाने केल्या तांत्रिक अडचणी दूर

पुणे : रेल्वे प्रशासनाने पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करून प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. मांजरी, कडेठाण, खुटबाव येथील प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. यातील खुटबाव येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होऊन प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. कडेठाण प्लॅटफॉर्मचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. यातील सर्व कामे मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणे-दौंड लोकल आता पूर्ण क्षमतेने मार्चनंतरच धावणार आहे.

गेल्या पंधरा वर्षांतील बहुप्रतीक्षीत आणि चर्चेत असलेली पुणे-दौंड लोकल सुरू करण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. खासदार सुुप्रिया सुळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-दौंड रेल्वे मार्गावर 25 मार्च 2017 मध्ये डेमूची चाचणी पूर्ण करण्यात आली. डेमू पूर्ण क्षमतेने रुळावर येण्यासाठी प्लॅटफॉर्मची उंची पुरेशी नव्हती. ही डेमू बारामतीपर्यंत सुरू करण्यात आली. वेळापत्रक कोलमडून पडले असताना त्यात डेमूतील तांत्रिक दोषाचा धूर निघू लागला. आतापर्यंत तीनवेळा डेमू पेटली. या अनेक समस्यांमधून मार्ग काढीत डेमू धिम्या गतीने धावत आहे. या मार्गावर ओव्हर ब्रीजचे काम सुरू करण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न करण्यात आले.

खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठपुरावा

पुणे शहराचा विस्तारित भाग म्हणून दौंड तालुक्याकडे पाहिले जात आहे. त्यात पुणे शहरात दरररोज नोकरी, व्यापार, शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थी आदी प्रवाशांची संख्या सुमारे सात हजारांवर आहे. गेल्या 20 वर्षांपासून पुणे-दौंड लोकलची मागणी होत आहे. त्यात ही मागणी निधींमध्ये अडकली होती. परंतु यातून तोडगा काढत हे काम मार्गी लागत आहे. प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. मांजरी, कडेठाण, खुटबाव, पाटस येथील स्थानकातील पादचारी पुलाचे काम अद्याप बाकी आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून लोकलची मागणी प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे.

लोकलला गती

लोकलला गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मांजरी, कडेठाण, खुटबाव येथील प्लॅटफॉर्मच्या कामांसाठी सुमारे सहा कोटींचा निधी देण्यात आला. त्यानंतर पुन्हा तांत्रिक बाधा निर्माण झाली होती. या स्थितीतही रेल्वे प्रशासनाकडून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पुणे विभागातील डीएमआर देऊस्कर, डेप्युटी सिनिअर डिव्हिजन इंजिनिअर समन्वयक सुरेश पाखरे यांनी या कामासाठी गती दिली. त्यामुळे हे काम आता मार्गी लागत आहे.

खुटबावचे काम पूर्ण

खुटबाव येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. कडेठाण येथील प्लॅटफॉर्मचे काम 30 दिवसांत पूर्ण होणार आहे. हे काम जानेवारी महिन्यांत पूर्ण होणार आहे. मांजरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे काम मार्चअखरेपर्यंत पूर्ण होणार आहे. मांजरीत एका बाजूने 200 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मार्चनंतरच डेमू धावणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दौंड उपनगर म्हणून घोषीत करा

पुणे ते दौंड विद्युतीकरण काम पूर्ण होऊन जवळपास 3 वर्ष उलटून गेली आहेत. परंतु अद्याप लोकल सेवा सुरू झाली नाही. कोट्यवधी रुपये खर्चून आम आदमी या सोयीपासून वंचित आहेत. तसेच उपनगरीय सेवा त्वरित सुरू करण्यात याव्यात आणि दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून त्वरित घोषित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. राज्यातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन ही मागणी येत्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मंजूर करून घ्यावी. विकास देशपांडे, सचिव, रेल यात्री संघ, महाराष्ट्र राज्य