कोणतेही नुकसान नाही
चाकण : वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने पुणे-नाशिक महामर्गावरील भाम हद्दीत दोन विद्युत खांब कोसळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच विद्युत खांब कोसळल्याने अनेक गावे व वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत रस्त्यातील वीज खांब व वीज वाहक तारा रस्त्यावर तशाच पडून होत्या. केवळ नशीब बलवत्तर म्हणून महामार्गावर कोसळलेल्या विजेच्या खांबाखाली व 32 के.व्ही.एच्या उच्च दाब प्रवाहित विजेच्या तारांमध्ये कुठलेही वाहन आले नाही व मोठी दुर्घटना टळली.
धोकादायक खांब बदलावेत
पुणे-नाशिक महामार्गावरील अनेक विद्युत खांब धोकादायक अवस्थेत असून या खांबांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होते आहे. वीज खांबाची ही टांगती तलवार प्रवासी व नागरिकांवर लटकत असताना महावितरणचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्गावरील अनधिकृत वीज खांब हटवून सर्व धोकादायक खांब त्वरीत बदलण्याची मागणी स्थानिक नागरिक व जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते निलेश कड-पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. महामार्गावरील बहुतांश विद्युत खांब खुप वर्षांपुर्वी जैसे थे असून सद्यःस्थितीत यातील अनेक विद्युत खांब धोकादायक झाले आहेत. काही हवेने डोलत असून काही खांब पूर्णतः गंजलेले व बुंध्याशी पूर्णतः सडलेले आहेत. त्यामुळे ते कधीही पडून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तारांकडे महावितरणचे दुर्लक्ष
महामार्गावरील अशा जीर्ण खांबांवरून गेलेल्या विद्युतवाहिन्या लोंबकळू लागल्या आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने आता रहदारीस अडथळे ठरणारे ट्रान्स्फॉर्मर, रस्त्यालगत धोकादायक बनलेले विजेचे खांब बदलले तर पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संभाव्य अपघात अथवा दुर्घटना टळू शकणार आहे. या गंभीर बाबीकडे महावितरण कंपनीने गांभीर्याने पाहून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात अशी पुणे नाशिक महामार्गावरील चाकण, वाकी गावातील नागरिकांची मागणी आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल डेरे यांनी सांगितले कि, राजगुरुनगर उपविभागाच्या अखत्यारीत येणार्या भाम हद्दीतील विजेचे दोन खांब पडलेले आहेत. विजेचे खांब आणि कंडक्टर तुटलेले असल्याने आंबेठाण फिडर वरील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला आहे. रात्री आठचे सुमारास घटनास्थळी कर्मचारी पाठविले असून विजेचा खांब काढण्याचे काम सुरु आहे. पाऊस सुरु असल्याने काही अडचणी येत आहेत. दरम्यान चाकण पंचक्रोशीतील वीज पुरवठा रात्री उशिरा पर्यंत खंडित होता. तांत्रिक बिघाड झाल्याचे वीज वितरणच्या अधिकार्यांनी सांगितले.