पुणे परिवहन महानगरच्या 178 कर्मचार्‍यांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु

0

‘त्या’ कर्मचार्‍यांना महिनाभरात पुन्हा पालिका सेवेत
महापालिका आयुक्त हर्डीकर यांंची माहिती

पिंपरी : पुणे परिवहन महानगर (पीएमपीएमएल) च्या 178 कर्मचार्‍यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. साधारण एक महिनाभराच्या कालावधीमध्ये हेे कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होतील, अशी माहिती आयुक्त व पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पूर्वीच्या पीसीएमटीकडे अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग करण्यात आले होते. या कर्मचार्‍यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)ला नितांत गरज असल्याने पीएमपीएमएलकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला दिले होते. तत्कालीन पालिका आयुक्तांनी या कर्मचार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त केले होते. त्यानंतरही काही कर्मचारी पीएमपीएमएलमध्ये रुजू झाले नव्हते. मुंढे यांनी पीएमपीएमएलमध्ये रुजू न झाल्यास कामावरुन कमी करण्याचा इशारा देताच कर्मचारी रुजू झाले होते. तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नयना गुंडे संचालक म्हणून आल्या आहेत.

पीएमपीएमएलमध्ये रुजू झालेल्या या 178 कर्मचार्‍यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग करुन घेण्यासाठी आमदार, महापौर, नगरसेवकांकडे फिल्डिंग लावली होती. त्यानुसार पालिका प्रशासनातही हालचाली सुरु झाल्या आहेत. या कर्मचार्‍यांना पालिकेत रुजू करुन घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. महिन्याभरानंतर ते कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होतील, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. तसेच पीएमपीएललच्या दिवसाला 1500 बस रस्त्यावर धावणे अपेक्षित आहे. परंतु, त्या धावत नव्हत्या. त्यामुळे काही कर्मचार्‍यांना नोटीसा दिल्या आहेत. तसेच पीएमपीएमएलसाठी नव्याने खरेदी करण्यात येणार्‍या 800 गाड्यांसाठी पुनर्निविदा मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.