पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत सद्या डेंग्युचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस या आजाराचे रूग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिकांनी जोरदार तपासणी मोहीम हाती घेतली असून, ज्या ठिकाणी अळ्या सापडत आहेत, अशा ठिकाणांना नोटिसा पाठविण्यात सुरुवात केली आहे. पुणे पालिकेने केलेल्या या पाहणीत शहरातील 12 पोलिस ठाण्यांच्या आवारातील पाण्याच्या डबक्यांमध्ये डेंग्युच्या अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांचे रक्षण करणार्या पोलिसांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्युची प्रसार केंद्रे ठरलेल्या या पोलिस ठाण्यांना आता नोटिसा बजावण्यात आल्या असून, डास उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना बजावले आहे. दरम्यान, पुण्यात एप्रिलमध्ये 23, मेमध्ये 28 डेंग्युचे रुग्ण आढळून आले असून, पिंपरी-चिंचवडमध्ये मार्च आणि मेमध्ये 140 रुग्ण आढळल्याचे वैद्यकीय सूत्राने सांगितले.
भरारी पथकाची स्थापना
पुणे महापालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, 19 जूनपासून डेंग्युसदृश स्थळे शोधण्याची मोहीम सुरु केली आहे. त्याप्रमाणे सावर्जनिक व खासगी ठिकाणी डास उत्पत्तीस्थळे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी 12 पोलिस ठाण्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत. डेंग्यु आणि चिकुनगुणिया या आजाराबाबात जनजागृती करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
रूग्णालयेही उत्पत्ती केंद्रे
राज्य हिवताप विभागाने केलेल्या तपासणीत हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील टेरेसवरही डेंग्युच्या अळ्या सापडल्याने डेंग्युची उत्पत्ती शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात होत आहे का? याची तपासणी करण्याचे आदेश राज्य हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. हेमंत जोशी यांनी पुणे पालिका आरोग्य विभागाला दिले आहेत.