पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 812 जणांना मिळाली म्हाडाची घरे

0
 मोहम्मदवाडी, पाषाण, येवलेवाडी, आंबेगाव, वाकड, रहाटणी, चिखली यासह अनेक ठिकाणी घरे
11 ते 20 लाखांमध्ये घरे : 36 हजार 568 लोकांनी केले होते अर्ज  
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने 812 घरांची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील 242 आणि पिंपरी-चिंचवडमधील 570 अशा 812 घरांसाठी सोडत होती. यासाठी 36 हजार 568 लोकांनी घरांसाठी अर्ज केले होते. याचे उद्घाटन अल्पबचत भवन येथे बुधवारी (दि.19) म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.
पहिल्यांदाच अर्ज आणि मिळाले घर
पुण्यात मोहम्मदवाडी, पाषाण, येवलेवाडी, आंबेगाव तर पिंपरीमध्ये वाकड, रहाटणी, चिखली यासह अनेक ठिकाणी घरे होती. या घरांच्या किमती दहा लाख 92 हजार सहाशे रुपये ते 19 लाख 56  हजार 134 रुपये दरम्यान आहेत. या घरांसाठी 21 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यात आले होते. सहा डिसेंबर पर्यंत ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्यात आले. यावेळी अनेक जणांनी पहिल्यादा घरासाठी अर्ज केला आणि त्यांना घरे मिळाली अशा सर्वांनी समाधान व्यक्त केले.
जानेवारीत 3700 घरांची सोडत
या सोडतीमध्ये ज्यांना स्वप्नातील घर मिळालं त्यांचे अभिनंदन. मात्र, ज्यांना घर मिळाले नाही, अशा लोकांनी आता निराश व्हायची गरज नाही. कारण पुढच्या महिन्यातच जानेवारीमध्ये 3700 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात 2600 घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
ऑनलाईनचा पॅटर्न पुण्याने आणला : सामंत
यावेळी पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी पद्धतीमध्ये एक टक्का जरी भ्रष्टाचार असेल, तर राजकारणातून मी निवृत्ती घेईन. जर भ्रष्टाचार सिद्ध नाही झाला तर ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी राजकीय निवृत्ती घ्यावी असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. दरम्यान सामंत बिल्डरांना जवळ करण्याचे काम करतात. तसेच म्हाडाच्या लॉटरीत गरजू लोकांपेक्षा शिवसेनेतील ठराविक लोकांनाच घरे मिळतात असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर केला होता. राणे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना ते बोलत होते. सामंत म्हणाले, म्हाडाची घरे जास्तीतजास्त पारदर्शी पद्धतीने होण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईनचा पॅटर्न हा खरा पुण्याने पुढे आणला, त्यानंतर कोकण आणि मुंबईत हाच पॅटर्न राबवण्यात आला.