विद्यमान उपाध्यक्ष असलेल्या भेगडे यांनी साधली हॅट्ट्रीक
तळेगाव दाभाडे : पुणे पीपल्स को- ऑप बँक या मल्टिस्टेट बँकेच्या संचालक मंडळाची 2017-2022 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत बबनराव भेगडे यांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली. बबनराव भेगडे हे बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष असून, त्यांनी या निवडीबरोबर पुणे पीपल्स बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवडून येण्याची हॅट्ट्रीक साधली आहे.
यांची झाली निवड
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी विशेष सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. संचालक मंडळामध्ये अॅड. सुभाष मोहिते, बबनराव भेगडे, विजयकांत कोठारी, जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, बिपीनकुमार शहा, श्रीधर गायकवाड, डॉ. रमेश सोनवणे, अंबर चिंचवडे, सुभाष गांधी, संजय गुगळे, मिलिंद वाणी, दिलीप दगडे आदींची निवड झाली.
महत्त्वाच्या पदांवर कामाचा अनुभव
बबनराव भेगडे यांनी यापूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरदेखील 15 वर्ष काम केले आहे. 1992-97 या काळात भेगडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचे संचालक, पुणे जिल्हा सहकार बोर्डचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. मावळ तालुक्यातील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक असून, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. 1952 साली पुणे पीपल्स को- ऑप बँकेची स्थापना झाली. मागील 66 वर्षात 25 शाखा व 1 विस्तारित कक्षासह कार्यरत असलेल्या पुणे पीपल्स बँकेने एकूण व्यवसायात 1560 कोटींचा टप्पा पार केला आहे.