पोलीस आयुक्तांचा निर्णय : पाच पथके बरखास्त होण्याची शक्यता
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांनी घेतला आहे. जर, या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर पाच पथके बरखास्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा प्रस्ताव मांडल्यानंतर पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या रचनेत युनिट-1,2,3,4,5 तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वॉड), वाहन चोरी विरोधी पथक अशी 13 पथके आहेत. गुन्हे शाखेत काही महत्त्वाचे फेरबदल करण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. वेकटेंशम यांनी मांडला. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांची बैठक पोलीस आयुक्तालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक पथक, प्रॉपर्टी सेल, वाहन चोरी विरोधी पथक, संघटीत गुन्हेगारीविरोधी पथक बरखास्त करून पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी मांडला. यानंतर अनेकांना हादरे बसल्याचे बोलले जात आहे. बरखास्त केलेल्या पथकांतील पोलिसांना सध्याच्या युनिट-1, 2, 3, 4, 5 किंवा खंडणीविरोधी पथकात सामावून घेतले जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकार्यांनी दिली.
म्हणून पथक होणार बंद
सध्या पथकांची संख्या लक्षात घेता, त्यांच्याकडून हव्या तशा कारवाया होताना दिसत नव्हत्या. सर्वच पथकाकडून सर्रास बेकायदा पिस्तूल पकडण्याच्या कारवाया होत होत्या. यामुळे ज्या कारणांसाठी पथकाची निर्मिती केली होती, तो उद्देश सफल होताना दिसत नव्हता. यामुळे कधी ना कधी ही पथके बंद करणे आवश्यक होते.
महत्त्वाचे फेरबदल
गुन्हे शाखेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात येणार आहेत. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी संपूर्ण गुन्हे शाखेची पुर्नरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव त्यांनीच मांडला आहे. अंतिम निर्णय त्यांच्याच अखत्यारित असेल.
प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा