पुणे – महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तथा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि गटनेते अरविंद शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. २१ मे’ला झालेल्या सर्वसाधारण सभेत भिमाले आणि शिंदे यांच्यात वाद झाला होता. यावेळी त्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीत टिकाटिप्पणी केली होती. यातूनच शिंदे यांनी भिमाले यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याने आता भिमाले यांनीही तसाच दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
अब्रुनुकसानीचा दावा
अरविंद शिंदे हे सभागृहात येणाऱ्या पुणे शहराच्या विविध विकास कामाच्या विषयामध्ये अडथळा आणण्याचे काम करत आहेत, सत्ता गेल्यापासून शिंदे, असे कृत्य करत आहे. २१ तारखेला सभागृहात त्यांनी मला मानहानीकारक भाषा वापरत स्वतःच आपल्या विरोधात पोलिसात गेले. तसेच न्यायालयात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मात्र आता आपण त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार येत्या ४८ तासात त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात न्यायालयात १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे-भिमाले वादामुळे महापालिकेची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करु, असे देखील महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.