मुंबई । पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा कार्यक्रम मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. हा बॉण्ड खुला झाल्याने शहरांचा पायाभूत विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री व नायडू यांच्या हस्ते शेअर बाजाराच्या परंपरेप्रमाणे बेल वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनीधी, वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्ड्सच्या माध्यमातुन निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास वाटतो.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पुणे देशातील सर्वोत्तम शहर होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत 2264 कोटी रुपयांच्या बॉण्ड पुणे महापालिकेने गुंतवणुकीसाठी दाखल केले आहेत. पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षात पुणे शहरामध्ये घनकचर्याचे विलगीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाणार आहे.
पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा- नायडू
देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले. ते म्हणाले की, शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. केंद्र शासनातर्फे देशभरात शहर विकासाकरीता 4.13 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय सहाय मिळाल्यावर त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभाग दिला पाहिजे. त्याचबरोबर शहरांनी आणि त्याचे व्यवस्थापन पाहणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:चा निधी उभारणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांच्या सुधारणांवर भर देण्यात येत आहे. जी शहरे अधिक चांगल्या पद्धतीने विकासाची कामे करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के निधी देण्यात येईल, असे आश्वासन नायडू यांनी यावेळी दिले.
नगरविकासाच्या क्षेत्रात पुणे महापालिकेने नवीन विक्रम केला आहे. बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी राज्य सरकार तयार असून केंद्राचीही मदत लाभणार आहे.
–गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे