नवी दिल्ली – मुंबई आणि पुण्यासह देशातील चार राज्यांमध्ये करोना संसर्गाची स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर या शहरांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्न आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके मुंबई आणि पुण्यात पोहोचलीही असून पाहणी करून दिल्लीत परतल्यानंतर केंद्र सरकारला अहवाल सादर करतील. महाराष्ट्रातील करोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पथक यापूर्वीच पाठवले आहे.
केंद्राकडे उपलब्ध असलेल्या तज्ज्ञांच्या माध्यमातून राज्यांना शक्य तितकी मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गृहमंत्रालयाने ही सहा आंतरमंत्रालय केंद्रीय पथके स्थापन केल्याची माहिती गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त पश्चिम बंगालसाठी दोन तर राजस्थान आणि मध्य प्रदेशसाठी प्रत्येकी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
पुण्यात दाखल झालेल्या आंतर मंत्रालय पथकाचे नेतृत्व ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा करत असून त्यात सामान्य आरोग्यसेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. के. सेन, एनडीएमएचे संयुक्त सल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, आरोग्य मंत्रालयाचे उपसचिव डॉ. आशीष गवई आणि अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे संचालक करमवीर सिंह यांचा समावेश आहे. मुंबईत दाखल झालेल्या सहा सदस्यांच्या पथकाचे नेतृत्व अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी करीत असून त्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. एस. डी. खापर्डे, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. नागेशकुमार सिंह, ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक अभयकुमार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संयुक्त सल्लागार अनुराग राणा यांचा समावेश आहे.