खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार
पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार
मुंबई- आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या(केबल स्टेड पूल) पुलानंतर आता देशातील सर्वात मोठा केबल स्टेड पूल पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर निर्माण केला जाणार आहे. खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार असून खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षक असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.
हे देखील वाचा
वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग
वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करणे, सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम करण्यास देखील या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे बांधकाम, ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलाचे बांधकाम आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बांधकामास मंजुरी देण्यात आली. एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.
वाशी खाडीवर तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी
वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.
