पुणे:शनिवारी रात्री पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास अप लाईनवरील दरड हटवण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक खुली करण्यात आली आहे. दरड कोसळल्याने शनिवारी रात्री अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागला होता. पण आता दरड हटवल्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर तातडीने लोणावळा व कल्याण येथील आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. मध्यरात्री दरड हटवण्यात त्यांना यश आलं. दरड कोसळल्याने कोल्हापूर-अहमदाबाद ही गाडी खंडाळा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली तर सोलापूरला जाणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सीएसटीलाच थांबविण्यात आली होती. यासह रात्रीच्या वेळेला धावणार्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. शुक्रवारी (24 ऑगस्ट) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास देखील याच ठिकाणी रेल्वे इंजिनच्या समोर दरड कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झालेली नाही.