पुणे मेट्रोसोबत ‘पिंपरी चिंचवड‘चेही नाव घ्या

0
मेट्रो पिंपरी चिंचवड शहरातून धावणार असल्याने अन्याय का?
स्थायी समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित
पिंपरी चिंचवड : मेट्रो प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी जोडला गेला असताना मात्र पुणे मेट्रो असा उल्लेख का? असा काहीसा सवाला सध्या उपस्थित झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नावाच्या मुद्द्यावरून या विषयाबाबत खूप चर्चा देखील रंगत आहे. सगळीकडे मेट्रोचा उल्लेख पुणे मेट्रो असा होत असल्याने पुणे मेट्रो पिंपरी-चिंचवडमधून धावत असल्याने पिंपरी-चिंचवडच्या नावाचा उल्लेख का नाही? असा दुजाभाव का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीत मेट्रो प्रकल्पात पिंपरी-चिंचवडचे नाव असावे, असा ठराव उपसूचनेद्वारे मंजूर करण्यात आला आहे.
‘पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रो‘ नामकरणाचा ठराव…
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातून मेट्रो प्रकल्प होत आहे. या प्रकल्पामध्ये पिंपरी-चिंचवडचा नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नामकरण करण्याचा ठराव समितीने उपसूचनेद्वारे मंजूर केला. सदर ठराव येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. या नामकरणासाठी लोकप्रतिनिधी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करणार आहेत, असे समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले. मात्र, मेट्रोचे अधिकारी प्रकल्पाचे नाव महामेट्रो असे सांगत आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशल लि.च्या वतीने मेट्रो प्रकल्प राबवले जात असल्याने पुणे मेट्रो असे अधिकृत नाव नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते. परंतु मेट्रोचे ठिकठिकाणी लावलेल्या बॅरीकेड्स चित्रांमध्ये पुणे मेट्रोचा लोगो स्पष्ट असताना हा प्रकार नेमका काय? यावर प्रश्‍न निर्माण होतो.
राजकीय मंडळींचा आक्षेप…
मेट्रोचे काम जेव्हा दोन्ही शहरात सुरू झाले तेव्हा वापरण्यात येत असलेल्या बॅरीकेड्स आणि इतर साधनांवर नागपूर मेट्रो असा उल्लेख होता. मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे नागपूरला अधिक प्राधान्य दिले जात असल्याची आवाई उठवत नागपूर मेट्रो या नावावर ताशेरे ओढण्यात आले. मेट्रोने तातडीने लागलीच त्याठिकाणी पुणे मेट्रो असे रंगकाम केले. आता पिंपरी-चिंचवडच्या राजकीय मंडळींनी या नावावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. मेट्रोला पिंपरी-चिंचवड शहरातून आणि महापालिकेकडून भरपूर सहकार्य मिळत आहे. पुण्याच्या तुलनेत मेट्रोला पिंपरी-चिंचवड शहरात कोणतीही अडचण येत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे काम सर्वाधिक वेगाने सुरू आहे, असे असतानाही सगळीकडे पुणे मेट्रो असे बोर्ड झळकत आहेत.
महापौरांच्या मुद्द्यावर निर्णय नाही….
मेट्रोमध्ये पिंपरी-चिंचवडचे कुठेही नाव नाही. महापौर राहुल जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्र्यासमक्ष हा मुद्दा उपस्थित केला होता. पंरतु अद्यापही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुण्यासोबत पिंपरी-चिंचडवडचे नाव जोडण्यास कोणत्याही अतिरिक्त खर्चाची गरज भासणार नाही किंवा कामात कोणतीही अडचण येणार नाही. मग पिंपरी-चिंचवडसोबत हा दुजाभाव का? असा सवाल पिंपरी चिंचवडच्या राजकीय पुढार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.