पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकचे सर्वेक्षण चार महिन्यात

0

पिंपरी-चिंचवड : पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरा व चौथा रेल्वे ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे सर्वेक्षण येत्या चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी 2018 पर्यंत या सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठविला जाणार आहे. अहवालाचे अवलोकन केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. या कामासाठी चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये 12 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण कामासाठी सुमारे 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, खर्चाची जबाबदारी राज्य शासन व रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. खासदार श्रीरंग बारणे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्रकुमार शर्मा, पुणे विभागाचे क्षेत्रिय प्रबंधक दादा भोये यांच्या उपस्थितीत पुणे येथे रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसर्‍या व चौथ्या ट्रॅकच्या विषयावर चर्चा झाली.

लोणावळा स्टेशनवर दोन एस्कलेटर
लोणावळा रेल्वे स्टेशनचा ‘क’ श्रेणीत समावेश झाला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा स्टेशनवर दोन एस्कलेटर (स्वयंचलित जिने) बसवण्यात येणार आहेत. त्यातील एक एस्कलेटर ऑक्टोबर 2017 च्या दरम्यान बसवले जाईल. तर डिसेंबरपर्यंत दुसर्‍या एस्कलेटरचे काम चालू होईल. लोणावळा गेट नंबर 30 येथील ओव्हर ब्रिज व गेट नंबर 32 भांगरवाडी येथील भूमिगत रस्त्याला रेल्वे विभागाने मंजुरी दिली असून, लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून हे काम लवकर सुरू होणार आहे. यासाठी 50 टक्के खर्च लोणावळा नगरपरिषद करणार आहे.

तळेगावात सब वे होणार
तळेगाव नगरपरिषद हद्दीतील पोल क्रमांक 51 या सब वेसाठी रेल्वे विभागाने 10 जून 2017 रोजी मंजुरी दिली असून, तळेगाव नगरपरिषद याची निविदा काढून काम पूर्ण करणार आहे. वडगाव, केशवनगर येथील गेट नंबर 49 सब वेसाठी पुणे रेल्वे विभागाने 1.56 कोटी रुपयांच्या प्रस्ताव तयार केला असून पुढील बजेटमध्ये या कामासाठी तरतूद होणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.

चिंचवड स्थानकावर विविध सुविधा
चिंचवड, पिंपरी, आकुर्डी या स्टेशनवरील सुविधांबाबत कार्यवाही चालू आहे. चिंचवड रेल्वे स्टेशनवर खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पादचारी पुलाची उंचीदेखील वाढवण्यात आली असून, त्यावर संरक्षक छत टाकण्यात आले आहे. प्लॅटफार्मची उंचीदेखील लवकरच वाढवली जाणार आहे. लोकलमध्येही सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.