पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाची तोडफोड

0

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय)चा अध्यक्षाने दारू पिऊन गोंधळ घातला आणि वसतिगृहातील काही खिडक्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. सतीश देबरे असे त्या अध्यक्षाचे नाव आहे. मंगळवारी रात्री 11च्या सुमारास क्रमांक 9च्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

या तोडफोडीच्या घटनेमध्ये देबरे याच्या हाताला इजा झाली आहे. एकूणच झालेला गोंधळ पाहून विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी, वसतिगृहाचे अधिकारी हजर झाले होते. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत देबरे याला ताब्यात घेतले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मते देबरे हा दारू पिऊन आला होता. त्यामुळे त्याने नशेत धुडगूस घातला. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या संपूर्ण प्रकारची चौकशी करून देबरे यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार असल्याचे श्रीराम कंधारे यांनी सांगितले.