पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘हेरिटेज’ मुख्य इमारतीमध्ये लवकरच पुरातन वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. दोन दालनांमध्ये उभारण्यात येणार्या संग्रहालयात विद्यापीठातील विविध विभागांमधील पुरातन वस्तू, दस्ताऐवज, शिल्पे, कागदपत्रे, संशोधन, विषयांवर अभ्यासपूर्ण माहितीफलक आणि ऐतिहासिक वास्तू विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी राहणार आहे. या विशेष भव्य संग्रहालयात येण्यासाठी विद्यापीठातील ब्रिटिशकालीन भुयारी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे खर्या अर्थाने नागरिक आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठात ऐतिहासिक अनुभूती मिळणार आहे.
संग्रहालय उभारण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली असून, त्यासाठी जाणकार तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये शैक्षणिक व इतर कामांसाठी फारसा बदल करता येत नाही. या इमारतीचे नूतनीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याने इमारतीला झळाळी मिळाली आहे. सध्या या इमारतीमध्ये कुलगुरू कार्यालय, एक मोठे सभागृह, दोन दालने असून, इमारतीतील मोठा भाग हा रिकामा आहे. या भागाचा वापर संग्रहालय करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा विचार सुरू असून, त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. त्यानुसार डॉ. करमळकर यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र लिहून विभागात असणार्या पुरातन वस्तू आणि गोष्टींची माहिती देण्याबाबत आवाहन केले होते. त्याला विभागप्रमुखांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
हे संग्रहालय उत्तम दर्जाचे असावे, यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या बैठका झाल्या असून, त्यामध्ये संग्रहालय उभारण्याबाबत एकमत झाले आहे. उत्तम संग्रहालयाची उभारणी होण्यासाठी संग्रहालयाची उत्तम जाण असणार्या एका व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. संग्रहालय मुख्य इमारतीत असले तरी ते विद्यार्थी आणि नागरिकांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. विद्यापीठात स्थावर विभाग ते मुख्य इमारत असा ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग अस्तित्वात आहे. या भुयारी मार्गाचा वापर संग्रहालयामध्ये येण्यासाठी करण्यात येईल, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.