पुणे विद्यापीठात विधी पदवीसाठी आता प्रत्येक विषयात 40 टक्क्यांची अट

0

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी स्तरावरील विधि (लॉ) विषयाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात तसेच, सर्व विषयांमध्ये सरसकट किमान 40 टक्के गुण मिळवण्याची अट राहणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वीची प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आणि सर्व विषयांमध्ये सरासरी मिळून किमान 50 टक्के गुणांची आवश्यकता असलेली गुंतागुंतीची अट आता रद्द होणार आहे. कुलगुरूंनी यापूर्वीच विधिच्या उत्तीर्णतेचे अट बदलणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अभ्यासक्रमात आणणार जीएसटी
केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या जीएसटी कायद्याचा नवा विषय म्हणून एम. बी.ए. आणि एम.कॉम. या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तो आताच्या टर्मपासून शिकवला जाणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून या विषयाचा डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (डीटीएल) या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात येणार आहे.

संरक्षण विभागात नवा कोर्स
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) विभागात पुढच्या शैक्षणिक वर्षापासून (2018-19) डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट अँड नॅशनल सिक्युरिटी या विषयावरील पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

प्राचार्यांची बैठक
पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून बर्‍याच काळापासून ही मागणी होत होती. आधीच्या अटींमुळे अनेक विद्यार्थी प्रत्येक विषयात उत्तीर्ण व्हायचे. मात्र, एकूण गुणांची सरासरी टक्केवारी 50 इतकी नसल्याने त्यांना अनुत्तीर्ण शेरा मिळायचा. त्यामुळे आजच्या विद्यापरिषदेत ही अट बदलून नवी अट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. नव्या अटीनुसार, विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण आणि एकूण गुणांची (ऍग्रीगेट) टक्केवारी 40 इतकी असली तर तो उत्तीर्ण समजला जाणार आहे. बार कौन्सिलच्या नियमांची पाहणी करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, विधी महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीही बैठक घेण्यात आली होती.