पुणे । आकर्षक रंग, अद्यावत आणि आरामदायी आसन रचना, आकर्षक अंतर्गत सजावट अशा स्वरुपातील ’प्रोजेक्ट स्वर्ण’ अंतर्गत पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस प्रवासासाठी सज्ज झाली आहे. या गाडीला सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झेंडा दाखविणार आहे.
ही शताब्दी एक्स्प्रेस 10 डब्यांची असून या गाडीची अंतर्गत सजावट आकर्षक करण्यात आली आहे. आसन रचना अद्यावत आणि आरामदायी करण्यात आली आहे. गाडीचा आतील रंग बदलला असून रंगाबरोबरच काही चित्रेही लावण्यात आल्यामुळे या गाडीतून प्रवास करणे आनंददायक ठरणार आहे. डब्यातील वातावरण सुगंधित रहावे यासाठी खास दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय अंध प्रवाशांसाठी ब्रेल लिपीतील सीट क्रमांक व स्टीकर लावण्यात आले आहेत. नवीन पद्धतीचे चार्जिंग होल्डर्स, पडदे, एलईडी, रिडींग लॅम्प यामध्ये आहेत. एक्जिक्युटीव्ह क्लासमध्ये वायफायची सोय केली आहे. नव्या रुपातील ही गाडी प्रवाशांसाठी ख्रिसमसची भेटच ठरणार आहे.