औंध । पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने, औंध वॉर्ड कार्यालयात शनिवारी दुसर्या ‘नागरिक सहभाग संवाद बैठकी’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बैठकीला ’पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप व इतर अधिकारी तसेच औंध-बाणेर- बालेवाडी (एबीबी) या स्थानिक क्षेत्रातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना जगताप यांनी विविध नागरी गटांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संभाव्य तोडग्यावर सकारात्मक चर्चा केली.
प्लेस मेकिंग्जचे सादरीकरण
स्मार्ट सिटीतर्फे अंमलात येणार्या ‘प्लेस मेकिंग’ या नाविन्यपूर्ण व अभिनव संकल्पनेचे सादरीकरण यावेळी नागरिकांसमोर करण्यात आले. आराखडा अंतिम टप्प्यात असलेल्या आणि आगामी काही महिन्यात आकाराला येणार्या वरिष्ठ नागरिकांच्या सुविधांसह सामुदायिक शेती, सायन्स पार्क, बुकजानिया या प्लेस मेकिंग्जचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्मार्ट सिटी मिशनच्या ‘रस्ते पुनर्रचना प्रकल्पांतर्गत’ करण्यात येणार्या विकास कामांसंबधीची मौल्यवान निरिक्षणेही नागरिकांनी यावेळी नोंदवली. ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा’ उपक्रमाचे यावेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. औंधमध्ये ही सेवा उपयुक्त ठरत असल्याचे सांगत बाणेर-बालेवाडीमध्येही ही सेवा सुरु करण्याविषयी नागरिकांनी विचारणा केली.
महिन्याच्या तिसर्या शनिवारी बैठक
नागरिकांचा सहभाग वाढवून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी औंध, बाणेर, बालेवाडी या तिनही क्षेत्रातील नागरिकांची एकत्र नागरी सहभाग संवाद बैठक औंध वॉर्ड कार्यालयात आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार, 2 डिसेंबर 2017 रोजी अशा स्वरुपाच्या पहिल्या बैठकीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला होता. त्यानंतर 6 जानेवारीला दुसर्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. औंध, बालेवाडी व बाणेर या प्रत्येक स्थानिक क्षेत्रातील नागरिकांशी अधिक उत्तमप्रकारे संवाद साधण्यासाठी या तिनही स्थानिक भागातील नागरिकांची स्वतंत्र नागरी सहभाग संवाद बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसर्या शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या बैठकीला उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.