पुणे : पुणे जिल्ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून वेगळी ओळख आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत ही ओळख आणखी दृढ झाली असून माहिती-तंत्रज्ञान आणि ॲटोमोबाईलचे देशातील प्रमुख केंद्र म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे स्मार्ट मॉडेल म्हणून विकसित होत असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिन समारंभात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या समारंभास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, जिल्हाधिकारी सौरभ राव, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, न्यायमूर्ती, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
बापट म्हणाले ,” केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत देशातून पुणे शहराची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा मान पुण्याला मिळाला. या योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यासाठी “पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड” या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, समान पाणीपुरवठा आणि स्मार्ट मिटरींग, झोपडपट्टी पुनर्विकास, स्मार्ट रस्ते, फुटपाथ, लाईट हाऊस, सेंट्रल कमांड कंट्रोल सेंटर, कॉमन मोबिलिटी कार्ड, सार्वजनिक वाहतुकीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार आहे. या सर्व कामांना सुरुवात झाली असून या योजनेमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पुणे शहराच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढविणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम 2020 पर्यंत पूर्ण होणार असून हिंजवडी ते शिवाजीनगर अशा 23.3 किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प नुकताच प्राधिकरण सभेने मंजूर केला आहे. या मार्गावर 23 स्टेशन असणार आहेत. या प्रकल्पास राज्य शासनानेही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2017-18 या वर्षाकरिता पुणे जिल्यातील 190 गावे टंचाईमुक्त करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहेत. त्या गावांमध्ये पाच हजार 858 कामे व 171.28 कोटी रक्कमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत एक हजार 245 कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी 418 कामे पूर्ण झाली आहेत व 827 कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी 2.32 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सन 2015-16 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानातील उत्कृष्ट कामाबद्दल पुणे जिल्हयाला राज्य पातळीवरील व्दितीय क्रमांकाचे तर पुरंदर तालुक्याला राज्यपातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
यावेळी काढण्यात आलेल्या पथ संचलनात राज्य राखीव पोलीस दल, महिला पोलीस पथक, पुणे ग्रामीण, पुणे शहर यांच्या जवानांनी भाग घेतला होता. तसेच सामाजिक वनीकरण, सामाजिक न्याय विभाग, सर्व शिक्षा अभियान, जलयुक्त शिवार अभियान, पुणे मनपा, स्वच्छ भारत मिशन यांचेही चित्ररथ सहभागी झाले होते.
समारंभात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मांढरे यांनी महिन्याभरात शिकविल्या जाणा-या सर्व विषयाच्या धड्यांचे संकलन करुन प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती केली. त्यामुळे 5-6 पुस्तकांऐवजी एकच पुस्तक घेऊन मुले शाळेत जाऊ शकतील.या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बापट यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, जिल्हा क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडा शिक्षक, गुणवंत क्रीडा संघटक, राष्ट्रीय हरित सेना पंचतारांकित शाळा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा तबीब व प्रिया बेल्हेकर यांनी केले.