पुणे : बालेवाडी क्रीडा संकुलात रविवारी पार पडलेल्या पुणे १० के इनटेनसिटी रनच्या सिझन २ च्या महिला आणि पुरुष एलिट रन विभागात अनुक्रमे प्रियांका चावरकर आणि चंद्रकांत मनवाडकर यांनी बाजी मारली.पुणे १० के इनटेनसिटी रनने गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरस कामगिरी केली. विविध क्षेत्रातील सहभागी धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे ४००० उपस्थितांनी गर्दी केली होती.
एलिट १० किलोमीटरची दौड ही या कार्यक्रमातली सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा असते. आपल्या लौकिकाला साजेशी अशी ही स्पर्धा पार पडली. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. यामुळे धावपटूंनाही अधिक चांगली कामगिरी करायला वातावरण तयार झाले होते आणि अंतिम रेषेपाशी उत्सुकतेने वाट बघत असणाऱ्या प्रेक्षकांनाही त्यांनी निराश केले नाही. विजेतेपद मिळवलेल्या प्रियांका आणि चंद्रकांत यांनी अनुक्रमे ४१:०५ मिनिटे आणि ३१:५५ मिनिटे ही वेळ नोंदवली. उद्घाटनाच्या कार्यक्रमापेक्षा यात लक्षणीय सुधारणा झाली होती.
सुरुवातीला, पुणे १० के इनटेनसिटी रन मध्ये पुणेरी पलटण संघातील खेळाडू गिरीष एर्नाक आणि अक्षय जाधव यांच्यासह राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेते कृष्णकुमार राणे आणि खुल्या पाण्यातील जलतरणपटू रोहन मोरे यांच्यासह ऑलिम्पिकपटू आणि माजी धावपटू आनंद मेंझेस यांनी या स्पर्धेला सुरुवात केली.
ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत जुई डोंगरे आणि जयभय दत्तात्रय यांनी विजेतेपद मिळवले. पुण्यानंतर हा कार्यक्रम हैद्राबाद येथे होणार असून तिथे तो २८ ऑक्टोबर २०१८ रोजी होण्याची शक्यता आहे.
या मॅरेथॉनला अॅथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया, पुणेरी पलटण आणि एफसी पुणे सिटी यांचे पाठबळ लाभलेले असून यामध्ये पुण्यापासून सुरुवात होऊन पाच वेगवेगळ्या राज्यांतील सहा शहरे समाविष्ट आहेत. एम्स (AIMS) प्रमाणित या कार्यक्रमात धावपटू १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि २ किलोमीटर अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला.
१० किलोमीटरची स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मैदान येथून सकाळी ६.३० वाजता सुरु झाली. मुंबई पुणे महामार्गाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावरून, बालेवाडी फाट्यावरुन मार्गक्रमण करत पुन्हा क्रीडासंकुलातील मैदानात येऊन स्पर्धेचा कळस साधला गेला.
यावेळी बोलताना १०के इनटेनसिटी रनचे प्रवर्तक आणि ऑलिम्पिकपटू आनंद मेंझेस म्हणाले, “पुणेकरांच्या लक्षणीय उत्साहाकडे बघताना पुण्यात यशस्वी मॅरेथॉनचं आयोजन करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना बघून खूप आनंद होत आहे. हा खूपच विलक्षण अनुभव आहे. मला येथे खूपच गुणवत्ता दिसून आली. राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांतील स्पर्धकांशी येथील स्पर्धक निश्चितच चांगला लढा देऊ शकतील अशी मला खात्री आहे. भारताने अॅथलेटीक्स सारख्या खेळांकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि पुणे यात महत्वाची भूमिका पार पडू शकते. एक ऑलिम्पिकपटू म्हणून मी जेव्हा लहान मुलं आणि तरुणांमध्ये खेळाविषयीची आणि धावण्याच्या स्पर्धेविषयीची आस बघतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. ”
पुणेरी पलटण स्टार खेळाडू गिरीष एर्निक याने पुणेकरांच्या उत्साहाला आणि इतक्या लवकर उठून येण्याच्या चिकाटीला सलाम केला. “मी दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. माझ्यासारख्या खेळाडूच्या दृष्टीने धावणे हा व्यायाम खूप महत्वाचा आहे आणि आनंद मेंझेस सारख्या खेळाडूला अशा कार्यक्रमात पाठींबा देणे माझ्यासाठी खूपच प्रतिष्ठेचे आहे. मी प्रत्येक शहरात या कार्यक्रमाला पाठींबा देणार आहे आणि पुणेरी पलटण सह या कार्यक्रमाचा एक भाग होता आलं याचा मला अभिमान आहे.”
१०के इनटेनसिटी रन आणखी एका मुख्य विचारसरणीला अनुसरून काम करत आहे. या उपक्रमातून भारतातील खेळाडूंना मदत करण्याची ही विचारधारा आहे. इंडियन ऑलिम्पियन्स असोसिअशन (माजी ऑलिम्पिकपटू संघटना)च्या पाठबळाच्या माध्यमातून यातून मिळणाऱ्या निधीपैकी काही भाग उदयोन्मुख खेळाडूंच्या जोडीला माजी आणि आजी ऑलिम्पिकपटूना देण्यात येणार आहे. त्यातून चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पैसा खर्ची पडेल. त्यामुळे केवळ भविष्यातील भावी खेळाडूंना प्रेरणा मिळेल असे नाही तर आपल्या देशात भावी ऑलिम्पिकपटूही निर्माण होतील.
पुण्याहून सुरुवात झालेली १० के इनटेनसिटी रन स्पर्धा पुण्यापाठोपाठ हैद्राबाद, बंगळूरू, मुंबई, चेन्नई इथे होणार असून त्याचा शेवट २४ फेब्रुवारी २०१९ रोजी कोलकाता येथे होईल.
निकाल : एलिट महिला १० किलोमीटर: १) प्रियांका चावरकर ४१:०५ मिनिटं, २) स्वाती व्हानवडे ४१:३२ मिनिटं ३) नयन किरदार ४१:५९.
एलिट पुरुष १० किलोमीटर : चंद्रकांत मनवाडकर ३१:५५ मिनिटं २)धर्मेंद्र कुमार यादव ३२:०० मिनिटं ३)प्रल्हाद राम सिंग ३३:१७ मिनिटं,
२ किलोमीटर फ्युचर चॅम्पियन स्पर्धा: मुले: १) महादेव कुंभार २)प्रथमेश होळकर ३)अभिषेक साखरे मुली: १)श्रीजा रेड्डी २)वगीशा कुमार ३) अनन्या सिरकी
ज्येष्ठ महिला १)जुई डोंगरे २)स्वाती अगरवाल ३) राजश्री
पुरुष: १) जयभय दत्तात्रय २)संतोष वाघ ३)जे. मुथूकृष्णन