‘पुण्य‘नगरी नव्हे ‘मद्य’नगरी!

0

पुणे (अक्षय फाटक) : ‘पुण्य‘नगरी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे आता मद्यनगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. दिवसाकाठी लाखो लीटर मद्य पुणेकर रिचवत असून, दिवसेंदिवस दारुड्यांची संख्या पुण्यात वाढतच आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूची दुकाने व बीअर बार बंद केले असले तरी शहरातील मद्यालये अहोरात्र सुरुच आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींनी आता शहराकडे आपली धाव वाढविली आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या तुलनेत 65 टक्के मद्य एकट्या पुणे शहरातच रिचवले जात असल्याचीही धक्कादायक माहिती हाती आली आहे.

ठरावीक ‘नाईटलाईफ‘ ठिकाणीही सर्रास मद्यविक्री
राज्यात मद्यपान करणार्‍यांची संख्या दिवसेदिंवस वाढत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरुन ही बाब स्पष्ट होत आहे. सद्याच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मद्यपान करणे हे एक आता स्टेट्स तयार झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीदेखील पुणे शहरात सर्रास मद्यपान करताना दिसून येत आहेत. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून महिन्यात पुणे जिल्ह्यात किती मद्यविक्री केले जाते, याची ही आकडेवारी आहे. यामध्ये पुणे शहरात 65 टक्क्यांच्या जवळपास मद्यविक्री पुणे शहरात होत आहे. शहरातील रात्रीचे काही स्पॉट तर अवैध मद्यविक्रीसाठीच तयार झालेले आहेत. मद्यालये, बीअरबार आणि वाईनशॉप यामधून तर मद्यविक्री होतेच; परंतु शहरातील नाईटलाईफ ठरलेल्या काही चौकांतदेखील खुलेआम मद्यविक्री होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. संबंधितांकडून पोलिस व उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना लक्ष्मीदर्शन केले जात असल्याची माहितीही सूत्राने दिली.

छुप्या मद्यविक्रीतही मोठी वाढ
महामार्गावर मद्यपान करून वाहने चालविण्याच्या प्रकारातून अपघातांचे प्रमाण मोठे वाढले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि महामार्गावरील मद्यविक्री बंदी केली. महामार्गापासून 500 मीटर आतील सर्व दुकाने आणि आस्थापनांमधील मद्यविक्री बंद करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. परंतु, ही मद्यालये बंद झाली असली तरी शहरातील दुकानांत गर्दी वाढली आहे. शासनाचा महसूल बुडाला असला तरी, छुपी आणि शहरातील हॉटेल्स, बीअरबार आणि वाईनशॉपमधील मद्यविक्री वाढून दारुड्यांची सोय झाली असल्याची बाबही प्राकर्षाने दिसून आली आहे.

जिल्ह्यात होणारी मद्यविक्री (1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017)
– देशी : 258.37 लाख लीटर (दिवसाला- 94.305 हजार लीटर)
– विदेशी : 306.32 लाख लीटर (दिवसाला- 111.806 हजार लीटर)
– बीअर : 499.40 लाख लीटर (दिवसाला-182.281 हजार लीटर)

चालूवर्षीची मद्यविक्री (आकडे हजार लीटर्समध्ये)
– जानेवारी : देशी 21.90, विदेशी 25.42, बीअर 34.16
– फेब्रुवारी : देशी 20.73, विदेशी 24.11, बीअर 37.42
– मार्च : देशी 24.41, विदेशी 27.93, बीअर 56.69