पिंपळनेर- डाकीण ठरवून एका महिलेला दगडांनी मारहाण करण्यात आल्याची घटना पुण्याचा पाडा येथे घडली. पिंपळनेर परीसरातील आदिवासीबहुल पुण्याचा पाडा येथे अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला. या पाड्यातील अंजना राजू बागुल (वय 48) या शेतात असताना गावातील गजमल धेडू बागुल, सुरेश गजमल बागुल, रवींद्र गजमल बागुल, ग्यानदेव गजमल बागुल हे तावातावाने चालून आले. तू डाकीण आहेस, तुझ्यामुळेच माझी पत्नी आजारी पडली. तुच काही तरी केले असे संबोधून गजमल याने अंजना बागुल यांच्याशी वाद घातला. शिवाय बागुल यांनी काही बोलण्यापूर्वीच गजमल व त्यांची मुले सुरेश, रवींद्र, ग्यानदेव यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात अंजनाबाई जखमी झाल्या. त्यानंतर चौघेही शिवीगाळ करून पसार झाले. हा प्रकार शनिवार, 29 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला होता. घटनास्थळ पोलिस ठाण्यापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर तसेच दुर्गम ठिकाणी असल्याने रविवारी सकाळी अंजनाबाई या तक्रार देण्यासाठी घराबाहेर पडल्या. मिळेल त्या साधनाने त्या सायंकाळी पिंपळनेर पोलिस ठाण्यात पोहोचल्यात. पिंपळनेर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गजमल व त्यांची तिघे मुले यांच्या विरुद्ध मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.