पुण्याच्या पाण्याचा खेळखंडोबा संतापजनक

0

सत्ताधारी भाजप बेजबाबदार

माजी आमदार मोहन जोशी

पुणे : गेले काही महिने पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत करून सत्ताधारी भाजपने पुणेकरांना मनःस्ताप दिला आहे. हा प्रकार निषेधार्ह असून भाजपच्या पुण्यातील आठही आमदारांनी राजीनामे देण्याचीच वेळ आली आहे, अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे. पाण्याच्या कारणासाठी या आमदारांचे राजीनामे तरी किती वेळा मागायचे? अशी संतप्त प्रतिक्रियाही जोशी यांनी व्यक्त केली आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता जलसंपदा विभागाने पुण्याचा पाणीपुरवठा बुधवारी तोडला. जलसंपदा खात्याच्या मनमानीचा हा तिसरा प्रकार आहे. या मनमानीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यापाठोपाठ आज गुरुवारीही सकाळी पर्वती जलकेंद्रातून लाखो लिटर पाणी वाहून गेले हे उद्वेगजनक आहे. ऐन दिवाळीतही भाजपने पुणेकरांवर पाणीकपात लादली होती. पुण्याचा पाणीपुरवठा एकदम दोनशे एमएलडीने कमी केला होता. या घडामोडींविरोधात काँग्रेसने आंदोलने केली. पुण्याला हक्काचे १६टीएमसी पाणी मिळावे ही आमची मागणी तेव्हाही होती, आजही आहे. न्याय्य हक्काचे पाणी पुणेकरांना देता येत नसेल तर पुण्यातील भाजपच्या आठही आमदारांनी राजीनामे द्यावेत ही मागणी यापूर्वीही आम्ही केली होती. न्याय्य हक्काच्या पाण्याची मागणी डावलून पाणीकपात करण्याच्या धमक्या पुणेकरांना दिल्या जातात. पाण्याचा हक्क डावलण्यामागे भाजपचे कुटील राजकारण असून या सत्ताधाऱ्यांची प्रशासनावर अजिबात पकड नाही, तसेच मंत्री आणि आमदारांमध्ये ताळमेळ नाही. या आमदारांनी आता राजीनामे देऊन घरी बसावे असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या अगोदर भाजपने २४ तास पाणीपुरवठ्याची आश्वासने पुणेकरांना दिली. ती आश्वासने फोल ठरली असून पुरेसे आणि नियमीत पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे, आणि दुसरीकडे पाण्यासाठी मीटर खरेदीची घाई चालली आहे. ती घाई कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी चालली आहे असा सवाल जोशी यांनी पत्रकात केला आहे.