सांगली । सांगली जिल्हा कबड्डी संघटना आणि हुतात्मा शिक्षण व उद्योग समुह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44व्या कुमार, कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुण्याच्या मुलींना विजेतेपद राखले. कोल्हापूरच्या मुलांना मात्र विजेतेपद मिळविण्याकरिता 5-5 चढायांच्या जादा डावापर्यंत शर्थीची लढत द्यावी लागली. वाळवा-सांगली येथील नागनाथअण्णा नगरातील मैदानावर झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात पुण्याने सातार्याचा कडवा प्रतिकार 32-28असा मोडून काढत स्व. चंदन सखाराम पांडे फिरता चषकावर सलग चौथ्यांदा आपले नांव कोरले. पहिल्या चढईपासून चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिली दहा मिनिटे गुणफलक सतत दोन्हीकडे झुकत होता. अखेर दहा मिनिटानंतर पुण्याने सातार्यावर लोण देत आघाडी घेतली.
मध्यांतराला पुण्याकडे 15-11अशी 4गुणांची आघाडी होती. हीच आघाडी शेवटी निर्णायक ठरली. मध्यांतरा नंतर देखील सामन्यात चुरस पहावयास मिळाली. या डावात दोन्ही संघांनी 17-17 गुणांची कमाई केली. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना 3गुणांची आघाडी पुण्याकडे होती. या वेळी पुण्याच्या चढाई करणार्या खेळाडूची पकड करण्याच्या नादात सोनाली हेळवी बाद झाली आणि सामना पुन्हा एकदा पुण्याच्या बाजूने झुकला. पुण्याच्या या 32 गुणात 4गुण लोणाचे, 3गुण बोनसचे, तर 2गुण एक अववल पकड करून मिळविलेले. पुण्याने हे जे दोन लोण देऊन चार गुणांची कमाई केली त्याचाच फायदा त्यांना झाला. सातार्याकडून एकही लोण नोंदला गेला नाही. सातार्याच्या 28गुणात 9 बोनस गुण आहेत.