हॉटेल कल्पना कट्टाचे आयोजन
पुणे : निवडणूक कोणाला कमी दाखविण्यासाठी लढवायची नाही. पुण्यासाठी मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. खासदार तर मी आताही आहेच. परंतु, लोकसभेचा खासदार झाल्यावर पुणेकरांचे प्रश्न व समस्या सोडवणे व त्यांच्या विकासासाठी काम करणे ही माझी नैतिक जबाबादारी बनते. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगतानाच पक्षासाठी केलेल्या कामामुळेच भाजप आपल्याला उमेदवारी नाकारणार नाही, असा ठाम विश्वास पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी व्यक्त केला. मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने प्रत्येक शनिवारी हॉटेल कल्पना कट्टा आयोजित केला जातो. या कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त खासदार संजय काकडे विशेष निमंत्रित होते. यावेळी ते बोलत होते.
भाजप उमेदवारी देणारच!
पुढील वर्षात होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात व पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असल्याप्रकरणी खासदार संजय काकडे यांना उपस्थितांनी प्रश्न विचारले. त्यावर खासदार काकडे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. माझी राज्यसभेची खासदारकी 2020 पर्यंत आहे. शिवाय मागच्यावेळी पाठिंबा दिलेल्या 52 आमदारांपैकी किमान 50 आमदार पुन्हा निवडून येतील. त्यामुळे मी परत राज्यसभेवर जाऊ शकतो. पुण्यासाठी आजही काम करतोच आहे. पण त्याला काही मर्यादा पडतात. लोकसभेचा खासदार झाल्यावर पुणेकरांच्या विकासासाठी काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी ठरते. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तसेच, भाजप आपल्याला निश्चितपणे उमेदवारी देईल. दीड लाख सदस्य नोंदणी आणि पक्षासाठी केलेले काम पाहता आपल्याला डावलले जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला.
कल्पना कट्ट्यावर होते प्रश्नांची उकल
प्रत्येक शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही निमंत्रित करतो. कल्पना कट्ट्याला एक वर्ष झाले आहे. येथे संबंधीत क्षेत्रीतील व्यक्तींसोबत चर्चा होते. त्यातून मार्गदर्शन मिळते. अनेक प्रश्नांची उकल होते, असे बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले. माजी महापौर प्रशांत जगताप, संजय नहार, राजेंद्र सावंत, बंडु आंदेकर, धीरज घाटे, शंकर पवार, अनिल जाधव व उदयकांत आंदेकर, राजेंद्र पाटील, दिनेश धाडवे, राजेश बारगुजे, राजेंद्र शिंदे, विशाल पवार आदी मान्यवर निमंत्रित होते. याप्रसंगी मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे, रविंद्र जेधे, अनिल बिडलाण, हर्षद मालुसरे आदी संयोजक उपस्थित होते.